डोंबिवलीच्या प्रदूषणाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी; मुख्यमंत्री येण्याआधी गुलाबी रस्त्यांची साफसफाई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोबिंवलीतील प्रदूषणाची पाहणी केली असून त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.
मुंबई : डोंबिवलीतील प्रदूषण आणि त्यामुळे गुलाबी झालेल्या रस्त्यांची बातमी माझानं बातमी दाखवल्यानंतर या परिस्थितीची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांनी आज (गुरूवारी) डोंबिवलीतील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. मुख्यमंत्री स्वतः पाहणी करण्यासाठी येणार म्हटल्यावर प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यांनी प्रदूषणामुळे गुलाबी झालेले रस्ते स्वच्छ करण्यासाठी सुरुवात केली. गटारातील गुलाबी पाणीदेखील पंप लावून उपसण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुरुवात झाली.
डोंबिवलीकरांनी रस्ते तसेच अन्य समस्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर प्रदूषणाच्या तक्रारी मांडू नये, यासाठी पोलीस नागरिकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. तसेच एमआयडीसी निवासी भागात राहणाऱ्या नागरिकांना पोलिसांनीच सभा स्थळावरून बाहेर काढल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ : डोंबिवली, ठाकुर्लीमधील प्रदुषणाचा एबीपीने लावला छडा
दरम्यान, प्रदूषणाची राजधानी बनलेल्या डोंबिवलीत एक रस्ता रासायनिक प्रदूषणामुळे चक्क गुलाबी झाल्याचं समोर आलं आणि मोठी खळबळ उडाली आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये हा प्रकार समोर आला. यानंतर इतके दिवस प्रदूषण सहन करत असलेल्या डोंबिवलीकरांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि डोंबिवलीकर रस्त्यावर उतरले. हे प्रदूषण आजचं नसून वर्षोनुवर्षे होत असल्याचं डोंबिवलीकरांचं म्हणणं आहे. याबाबत अनेकदा एमआयडीसी आणि एमपीसीबीकडे नागरिकांनी तक्रारीही केल्या, मात्र कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता डोंबिवलीत जगायचं कसं? असा इथल्या नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
डोंबिवलीच्या या प्रदूषणामुळे डोंबिवलीकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात प्रदूषणामुळे आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून त्यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. शिवाय स्वतः डॉक्टरसुद्धा हाच त्रास सहन करत आहेत.
पाहा व्हिडीओ : डोंबिवली प्रदूषणाच्या विळख्यात
डोंबिवलीच्या या प्रदूषणाबाबत कंपन्यांची संघटना असलेल्या कामा संघटनेने मात्र प्रदूषणाबाबत हात वर केले आहेत. डोंबिवली एमआयडीसीतली एकही कंपनी प्रदूषण करतच नसल्याचा दावा कामा संघटनेने अगदी छातीठोकपणे केला आहे. त्यामुळे आपल्यालाच सगळं गुलाबी गुलाबी दिसतंय का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दरम्यान, चार वर्षांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीतल्या प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट होऊन 12 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी डोंबिवलीतल्या धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आज याबाबत आणि प्रदूषणाबाबत विचारलं असता ही जबाबदारी पर्यावरण मंत्र्यांची असल्याचं सांगत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रदूषणाची राजधानी बनलेल्या डोंबिवलीबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
डोंबिवलीत चक्क गुलाबी रस्ता, उद्योगमंत्र्यांनी पर्यावरण मंत्र्यांवर जबाबदारी ढकलली!