एक्स्प्लोर
मदत केल्याची जाहिरात करायची का? पॅकेजची मागणी करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी विरोधकांनी केलेल्या पॅकेजच्या मागणीवरुन चांगलीच टीका केली.
मुंबई : केंद्र सरकारने पॅकेज दिलं तसं पॅकेज राज्य सरकारने द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली होती. या मागणीसह विरोधकांनी सरकारविरोधात आंदोलन देखील केलं होतं. यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आज फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की, काहीजण विचारत आहेत पॅकेज का घोषित केलं नाही. राज्यातील परिस्थिती राजकारण करण्याची नाही. त्यामुळे माझ्याकडूनही राजकारण होणार नाही, पण नेत्यांनी राजकारण करू नये. पॅकेजची मागणी केली जात आहे. केंद्राकडून पॅकेज देण्यात आलं. पण ते पॅकेज उघडलं, तर त्यात काहीच नाही. तो फक्त रिकामा खोका निघाला. पॅकेज काय घोषित करायचं? जाहिरात करायची की मदत करायची. पोकळं घोषणा करणारं आमचं सरकार नाही. पॅकेज घोषित कशाला करायचं? त्यापेक्षा सरकारनं प्रत्यक्ष मदत करण्याचं कामं केलं आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले की, आज गोरगरीबांना अन्न मिळणं, उपचार मिळणं हे महत्वाचं आहे. आपण गरीबांना उपचारासाठी मदत केली. शिवभोजन योजनेअंतर्गत पाच रुपयात भोजन दिलं. 7 ते 8 लाख मजूरांना घरी पाठवलं, यासाठी कुठलं पॅकेज द्यायचं? असा सवाल करत पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यभरात गोरगरीब, मजूरांसह लाखो लोकांना मदत केली आहे. त्याची जाहिरात करायची का? असा टोला देखील त्यांनी लगावला. आम्ही रोज 80 ट्रेनची मागणी केंद्राकडे केली आहे. मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. त्यांचा खर्च आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.
CM Uddhav Thackeray | कोरोनाचा गुणाकार जीवघेणा होणार, पण राज्य सरकार सज्ज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूपच कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. एसटीच्या माध्यमातून लाखो लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेजवळ सोडलं आहे. त्यासाठी 75 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. यासाठी कुठलं पॅकेज घोषित करायचं? असा सवाल देखील त्यांनी केला. हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे कोणी राजकारण करु नका. तुम्ही केलं तरी आम्ही राजकारण करणार नाही. केंद्राकडूनही अनेक गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या नाहीत मग मी बोंब मारु का ? असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
आकड्यांबाबत आपण अंदाज खोटा ठरवला
राज्यात मे महिन्याच्या अखेरीस सव्वा ते दीड लाख कोरोनाबाधित आढळतील असा अंदाज केंद्राच्या पथकाने नोंदवला होता. मात्र आज राज्यात केवळ 33686 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात आजघडीला 47190 कोरोनाबाधित आहेत त्यापैकी 13404 बरे झाले आहेत. आपण शिस्त दाखवली त्यामुळं आपण अंदाज खोटा ठरवला आहे. आपण शिस्त पाळल्यानेच आपण आकडे आटोक्यात आणले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात साडेतीन लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
काय म्हणाले होते फडणवीस
केंद्र सरकारने पॅकेज दिलं तसं पॅकेज राज्य सरकारने द्यावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होत आहे. शेतमाल घरीच पडून आहे. खरेदीसाठी राज्य सरकारने व्यवस्था केलेली नाही. खरेदीचे पैसे केंद्र सरकार देतं, खरेदी राज्य सरकारला करावी लागते. त्याचीही व्यवस्था अद्याप झालेली नाही. खरिपाचा नवीन हंगाम आहे, त्याची व्यवस्था झालेली नाही. बियाणं, खतं, कर्ज मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर विचित्र परिस्थिती आली आहे. यासोबतच बारा बलुतेदारांसमोर मोठं संकट आहे. ज्याप्रकारे केंद्र सरकारने एक पॅकेज दिलं, वेगवेगळ्या राज्य सरकारांनीही पॅकेज दिलं आहे. महाराष्ट्राचं एकमेव सरकार आहे, ज्याने पॅकेज दिलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही पॅकेज दिलं पाहिजे. विशेषत: बारा बलुतेदारांना पॅकेज दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement