(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, बैलगाडा शर्यतीच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यंतीवरील बंदी मागे घेण्याच्या निर्णय आज घेतला. या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे.
मुंबई : पशूधनाचा जीवापाड सांभाळ करणाऱ्या बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैलगाडी शर्यतीवरील निर्णयाचे स्वागत केले आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टीकवून ठेवणाऱ्या या शर्यंतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱ्या सर्व पशूप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. आता शर्यती सुरु होतील, त्यामधून आपल्या लोकपरंपरेचे आणि पशूधनाचे वैभवही सगळ्यांना पाहता येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार आणि पशूधनाचा कदापीही छळ होऊ नये. त्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यानी केले आहे. या शर्यती सुरु झाल्या असल्या तरी भविष्यातली लढाई बाकी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले आहे.
बैलगाडी शर्यत ही पशूपालक आणि पशूधनावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बळीराजाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत पशूधनालाही दैवताचे स्थान आहे. यातून पशूधनाचे जतन, संवर्धनाचाही विचार केला गेला आहे. शर्यंतीमधून या सगळ्या बाबींना प्रोत्साहन मिळत असे. शर्यंती सुरू व्हाव्यात यासाठी दीर्घ असा आणि चिवटपणे लढा द्यावा लागला. त्यामागेही बळीराजाचे आपल्या पशूधनावरील प्रेमाचे बळ होते. शर्यती, असोत किंवा नसोत, आपले पशूपालक या पशूधनाची पोटच्या लेकरांप्रमाणे काळजी घेतात, हे सर्वांनाच माहित होते. आता शर्यती सुरु होतील, त्यामधून आपल्या लोकपरंपरेचे आणि पशूधनाचे वैभवही सगळ्यांना पाहता येईल, असेही ठाकरे म्हणाले.
कायमस्वरुपी दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करणार - सुप्रिया सुळे
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. विविध राजकीय नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, की या शर्यती सुरु झाल्या असल्या तरी भविष्यातली लढाई बाकी आहे. याबाबत कायमस्वरूपी दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुळे म्हणाल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे आभार आणि अभिनंदन केले. सुप्रीम कोर्टाचे देखील आभार मानले. हे महाविकास आघाडीची यश असल्याचे सुळे म्हणाल्या.
हा शेतकऱ्यांच्या लढाईचा विजय - नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शेतकऱ्यांच्या लढाईचा हा विजय असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. पशू व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी सतत याचा पाठपुरावा केल्याचा उल्लेख करत पटोलेंनी केदार यांची पाठ थोपाटली आहे. आजचा क्षण शेतकऱ्यांच्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. यावेळी पटोले यांनी राज्यातील शेतकऱ्यांनाही शुभेच्छा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या :
- बैलगाडी शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी परवानगी, चांद्यापासून बांद्यापर्यंत जल्लोष
- Bail Gada Sharyat : बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्याबाबत राज्य सरकारची नियमावली - वाचा मुद्देसुद आणि सविस्तर