योग्य वेळी, योग्य उत्तर देऊ; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
युतीचं जागा वाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरातील युतीसंदर्भात केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. योग्य वेळ आल्यावर योग्य उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यानी दिली आहे.
युतीचं जागा वाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी, योग्य उत्तर दिलं जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली.
एकीकडे भाजप युतीसाठी उत्सुक असताना, शिवसेना मात्र सातत्यानं 'एकला चलो रे'चा नारा देताना दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर थेट हल्लाबोल करत आहेत, मात्र भाजपचे नेते त्यांच्या टीकेला उत्तर देण्याऐवजी युतीची भाषा करताना दिसत आहेत.
पंढरपुरात उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
उद्धव ठाकरेंनी पंढरपुरातील आपल्या भाषणातही भाजपल लक्ष्य केलं. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे, असं असताना सगळे निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मात्र शिवसेना शेतकरी आणि दुष्काळासाठी काम करत आहे. जागावाटप खड्ड्यात गेलं, आधी शेतकऱ्यांचं बघा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. दुष्काळ, राम मंदिर, कांदा प्रश्न, राफेल घोटाळा, पीकविमासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार फटकारे ओढले. जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत असतात तिथे राष्ट्रीय पक्षाला धूळ चारली आहे, असे सांगत त्यांनी भाजपला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
आक्रमक शिवसेनेना चोख उत्तर देण्याऐवजी भाजपचं घालीन लोंटागण सुरु आहे. पंढरपूरच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदीवर टीकेचे घाव घातले. तरीही भाजप सेनेला चुचकारत असल्याचं चित्र आहे. आपल्या या मित्राला पहिल्या तीन वर्षात भाजपनं आपमानास्पद वागणूक दिली, त्याचा वचपा आता शिवसेना काढताना दिसत आहे. भाजपनेही सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ऐकूण घेण्याची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
संबंधित बातम्या
जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा : उद्धव ठाकरेंचं सरकारवर शरसंधान