सीएसएमटी पुल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांचं पहिलं आरोपपत्र न्यायालयात सादर
14 मार्च रोजी सीएसएमटी स्टेशनवरील हिमालय पूल कोसळून सात जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाल्याची घटना घडली.
मुंबई : सीएसएमटी हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी आपलं पहिलं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबई सत्र न्यायालयात दाखल झालेल्या सुमारे 650 पानांच्या या आरोपपत्रात मुंबई पोलिसांनी घटनेचं सीसीटीव्ही फुटेज, मुख्य आरोपी ऑडिटर नीरज देसाईची भूमिका, साक्षीदारांचे जवाब, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आणि या दुर्घटनेत बळी गेलेल्यांचे शवविच्छेदन अहवाल तसेच जाणकारांचे अहवाल जोडले आहेत.
याप्रकरणी अटकेत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांविरोधात लवकरच स्वतंत्र पुरवणी आरोपपत्र दाखल केलं जाईल, असं पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी पुलाच्या सिमेंटचे आणि गंजलेल्या सळ्यांचो नमुने कलिना फॉरेंसिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले होते.
नीरज देसाईच्या कंपनीनं हा पुल वापरासाठी योग्य असल्याचा अहवाल पालिकेला सादर केला होता. या दुर्घटनेनंतर 18 मार्च रोजी नीरज देसाई यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 304 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
14 मार्च रोजी सीएसएमटी स्टेशनवरील हिमालय पूल कोसळून सात जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाल्याची घटना घडली. या हादरवून सोडणाऱ्या घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.