(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC Budget 2023 : बीएमसीच्या शाळांचा दर्जा आणखी सुधारणार, शिक्षणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद
BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी भरीव तरदूत करण्यात आली आहे. आयुक्त आणि प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला.
BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा (Mumbai Municipal Corporation) 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी सादर केला. यंदा मुंबई महापालिकेने विक्रमी 52 हजार कोटीचं बजेट सादर केलं आहे. आजच्या बजेटमधून मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. शिक्षण खात्यासाठी नवीन योजना आणि प्रकल्प राबवण्यासाठी यंदाच्या बजेटमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष योजना आणि प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यासाठी 3347 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमावर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. शिवाय यापुढे बीएमसीच्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम पाहायला मिळतील. 2022 ते 2025 कालावधीत शाळा इमारतींची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षेसाठी तब्बल 100 कोटींची तरतूद करण्यात आलीय.
BMC Budget 2023 : अर्थसंकल्पात शिक्षणासाठी खास तरतूद
बीएमसी शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळांसाठी 60 लाख रूपयांची तरतूद करण्यात आलीय. तर ऑलिम्पियाड परीक्षांसाठी 38 लाखांची तरतूद करण्यात आलीय.
व्हरच्युल क्लासरूमसाठी 3. 20 कोटी, ई वाचनालयासाठी 10 लाख तर डिजिटल क्लासरूमसाठी 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका शाळांतील प्रशिक्षण आणि उपक्रमांना ही महत्त्व देण्यात आले असून रस्ता सुरक्षा दल, शाळाबाह्य मोहीम, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यासाठी 28 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
2022 ते 2025 या कालावधीत शाळा इमारतींची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षेसाठी तब्बल 100 कोटींची तरतूद
पालिका शाळांमध्ये असणाऱ्या संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी 10.32 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन सॉफ्टवेअर, अधिक क्षमतेने, वेगाने वापरण्यास मिळणार आहे.
आर्थिक वर्ष 2023 - 24 मध्ये पालिका शिक्षण विभागाकडून अनेक नवीन प्रकल्प आणि योजना हाती घेण्यात आल्या आहेत.
नवीन आर्थिक वर्षातील नवीन प्रकल्प म्हणजे कौशल्य विकास प्रशिक्षण असणार आहे. यासाठी 28.45 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
निवडक शाळांमधील मुलांना त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाकडून परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्मिती करण्यात येणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात येणार असून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 1 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पालिका शाळांतील सुरक्षा वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
BMC Budget 2023 : मुंबई बजेटचा धमाका, पहिल्यांदाच 50 हजार कोटी पार, कोणतीही नवी करवाढ नाही, प्रदूषण रोखण्यावर भर