धर्मांतराची तक्रार करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण; आमदार नितेश राणे भडकले!
उल्हासनगरमध्ये एका धर्माच्या 26 वर्षीय तरुणाने दुसऱ्या धर्मातील एका 24 वर्षांच्या तरुणीला पळवून नेल्याची घटना घडली होती.या प्रकरणात पोलिसांना जाब विचारण्यासाठी नितेश राणे हे आज पोलीस ठाण्यात आले होते.
Bjp MLA Nitesh Rane At Ulhasnagar : धर्मांतराची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आणि गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करत आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे उल्हासनगर पोलिसांवर चांगलेच भडकले. या प्रकरणात पोलिसांना जाब विचारण्यासाठी आमदार नितेश राणे हे आज उल्हासनगर पोलीस ठाण्यात आले होते.
उल्हासनगरमध्ये एका धर्माच्या 26 वर्षीय तरुणाने दुसऱ्या धर्मातील एका 24 वर्षांच्या तरुणीला पळवून नेल्याची घटना घडली होती. एका दुकानात एकत्र काम करत असताना या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र घरच्यांचा संभाव्य विरोध लक्षात घेत हे दोघे पळून गेले. याप्रकरणी 8 ऑक्टोबर रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सदर तरुणी हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. ही तरुणी या तरुणासोबत आधी केरळ आणि तिथून पश्चिम बंगालला गेली. याबाबतची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी थेट पश्चिम बंगाल गाठत वीरभूम जिल्ह्यातील नानूर इथे जाऊन या तरुण आणि तरुणीची भेट घेतली.
यावेळी आम्ही लग्न करणार असून आम्हाला परत येण्याची इच्छा नसल्याचं स्टेटमेंट या मुलीने पोलिसांना दिलं. ही मुलगी सज्ञान असल्यामुळे पोलीस तिच्या इच्छेविरुद्ध तिला परत आणू शकले नाहीत. याबाबत उल्हासनगरातील भाजप आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, तसंच कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आरोपीसारखी वागणूक देत मारहाण करत त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी त्यांना दिली, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला.
या प्रकारानंतर नितेश राणे यांनी आज उल्हासनगर पोलीस ठाण्यात येत सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश फुलपगारे यांची भेट घेतली. या भेटीत नितेश राणे यांनी पोलिसांवर चांगलीच आगपाखड केली. तक्रार करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल करत नितेश राणे हे अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. मात्र पोलिसांकडून त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे नितेश राणे यांनी आता या अधिकाऱ्यांविरोधात थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन त्यांना शिक्षा व्हावी यासाठी आपण वरपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितलं. तसंच पोलिसांना सिंघम बनायचं असेल, तर जे धर्मांतर करतात, मुलींना पळवून देतात त्यांना पकडा, असंही नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, या सगळ्याबाबत उल्हासनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांना विचारलं असता, नितेश राणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याबाबत विचारणा करण्यासाठी आमच्याकडे आले होते आणि आम्ही त्यांना योग्य ती माहिती दिली आहे, असं म्हणत राठोड यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं.
आमदार नितेश राणे हे पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. नितेश राणे म्हणाले की, उल्हासनगर आणि कल्याण शहरात धर्मांतराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून त्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं. तसंच आमचे कार्यकर्ते हे धर्मांतराच्या विरोधात भूमिका घेत असून मुलींना धर्मांतर करण्यापासून वाचवत आहेत. ते कुठेही चोऱ्या, पाकीटमारी करत नाहीत त्यामुळे त्यांना सुद्धा पोलिसांनी योग्य वागणूक द्यावी, असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.