(Source: Poll of Polls)
Bihar Election 2020 | तेजस्वी यादव बिहारच्या लोकांसाठी आशेचा किरण : रोहित पवार
बिहारमध्ये निवडणूक जातीवर न होता बेरोजगारीच्या विषयावर होत आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात जनमत आहे. तेजस्वी यादव हे सध्या तिथल्या लोकांसाठी आशेचा किरण आहेत, असं निरीक्षण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नोंदवलं आहे.
मुंबई : " बिहारमधील राजकारण युवांनी हातात घेतलं आहे. तिथे बेरोजगारी हा मुख्य मुद्दा आहे. तेजस्वी यादव हे सध्या तिथल्या लोकांसाठी आशेचा किरण आहेत. त्यांच्या सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद होता. तर भाजपच्या सभांना शांतता होती. लोक सकारात्मकतेने तेजस्वी यादव यांच्याकडे पाहत आहेत. भाजप 31 चॉपरमधून फिरुन प्रचार करत आहे, तर तेजस्वी यादव एकटा एका चॉपरमधून प्रचार करत आहेत," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही तरुण आमदार बिहारमध्ये जाऊन तिथला आढावा घेऊन आले. तिथल्या परिस्थितीचा आणि राजकारणाचं विश्लेषण रोहित पवार यांनी केलं.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 243 जागांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 28 ऑक्टोबर रोजी पाडलं. आता 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी पुढील दोन टप्प्यांचं मतदान पार पडेल. कोरोना काळातली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे अनेक अर्थाने ही निवडणूक महत्त्वाची आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यासाठी रोहित पवार यांच्यासह काही आमदारांनी बिहारमध्ये जाऊन तिथल्या परिस्थिती आढावा घेतला. याबाबत माहिती देताना रोहित पवार म्हणाले की, "नितीश कुमार यांच्याविरोधात जनमत आहे. भाजप आणि जेडीयू यांच्यात अंतर्गत वाद आहेत. नीट निगोसिएशन न झाल्याने जेडीयू नाराज आहे. भाजप आपल्याला दाबत आहे ही भावना जेडीयूमध्ये आहे."
दुसरीकडे चिराग पासवान हे फक्त मतविभाजनसाठी आहेत याची जाणीव लोकांना झाली आहे, असा दावाही रोहित पवार यांनी केला. बिहार निवडणुकीच्या तोंडावरच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं. त्यांचे पुत्र चिराग पासवान यावेळी स्वतंत्र निवडणूक लढत आहेत.
"बिहारमध्ये निवडणूक जातीवर न होता बेरोजगारीच्या या विषयावर होत आहे," असं रोहित पवार म्हणाले. "लॉकडाऊन काळात लोकांचे अनुभव वाईट आहेत. इतर राज्यांनी काळजी घेतली. ट्रेन प्रवासात जेवण दिलं, पण बिहारमध्ये आल्यावर साधा प्रवेश देत नव्हते. इथे आल्यावर काही विशेष सुविधा नव्हत्या, आलेल्या मजुरांबद्दल काही योजना देखील केलेल्या नाही, असा आरोपही त्यांनी केला.
रोहित पवार म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येऊन भाषण जरी करत असले तरी ते इथे सत्ता मिळणार नाही. इथे कोण पर्याय आहे याकडे लोक पाहतात."
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा बिहार निवडणुकीच्या प्रचारात उचलला गेला आणि त्यावर मोठं राजकारणही झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु सुशांत सिंह प्रकरणाचा काही प्रभाव नाही. त्यांचा भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे, पण तोही आता तो विषय उपस्थित करत नाही, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला.
WEB EXCLUSIVE | बिहारमधील जनतेचा कौल कुणाला? बिहारचा दौरा करुन आलेल्या रोहित पवार यांना काय वाटतं?