(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर?
जर संप झाला तर पुन्हा एकदा मुंबईकर वेठीस धरले जाणार आहेत. तसेच आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेस्टचे आर्थिक नुकसान होणार हे सुद्धा निश्चित आहे.
मुंबई : आज मध्यरात्रीपासून किंवा त्यानंतर कधीही बेस्ट कर्मचारी संप पुकारतील, असा इशारा बेस्ट कामगार संघटनांनी यापूर्वीच दिला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तसेच बेस्ट प्रशासन आणि संघटना यांच्यातील सामंजस्य कराराबाबतच्या मागण्यांसाठी हा संपाचा इशारा दिला जात आहे.
आज दुपारी 2 वाजता बेस्ट भवन येथे कामगार संघटना व बेस्ट प्रशासन यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जर कर्मचाऱ्यांना अपेक्षित निर्णय न झाल्यास संध्याकाळी शिरोडकर हायस्कुलमध्ये होणाऱ्या कामगार मेळाव्यात संपाबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
जर संप झाला तर पुन्हा एकदा मुंबईकर वेठीस धरले जाणार आहेत. तसेच आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेस्टचे आर्थिक नुकसान होणार हे सुद्धा निश्चित आहे. बेस्ट वर्कर्स युनियनने, कामगारांच्या विविध मागण्यांबाबत यापूर्वी 9 जानेवारीपासून 9 दिवस संप करुन बेस्ट वाहतूक बंद पडली होती. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास झाला होता. त्यावेळी न्यायालयात प्रकरण गेले व त्यातून कामगार संघटनांनी संप मागे घेतला होता.
त्यावेळी, बेस्ट प्रशासनाने कामगार संघटनांना काही आश्वासने दिली होती. मात्र त्याची पूर्तता होत नसल्याने आणि बेस्ट सोबतचा सामंजस्य करार कामगारांना अपेक्षित असा व्हावा यासाठी पुन्हा एकदा 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संप पुकारण्याचा इशारा बेस्ट कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या
निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी, मार्च 2016 मध्ये वेतन करार संपल्याने करार पुन्हा करणे, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न, सामंजस्य करार अशा विविध मागण्या आहेत.