एक्स्प्लोर
परंपरा खंडीत करणारा लॉकडाऊन, नारळी पौर्णिमेआधीच जीव धोक्यात टाकत मासेमारीला सुरुवात
चार महिन्यापासून कोरोनामुळे घरात बसून असल्यामुळे त्यांना घर चालवणं अवघड झालं आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक बंदरांवर छोट्या छोट्या बोटी मासेमारीसाठी खवळलेल्या समुद्रात जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मुंबई : उद्या नारळी पौर्णिमा आहे. परंपरेप्रमाणे नारळी पौर्णिमेपासून कोळीबांधव मासेमारी सुरु करतात. मात्र यंदा कोरोना लॉकडाऊनमुळं पौर्णिमेच्या बरेच दिवस आधीपासून कोळी बांधव आपला जीव धोक्यात घालून मच्छीमारीसाठी समुद्रात जात आहेत. गेल्या चार महिन्यापासून कोरोनामुळे घरात बसून असल्यामुळे त्यांना घर चालवणं अवघड झालेलं आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक बंदरांवर छोट्या छोट्या बोटी मासेमारीसाठी खवळलेल्या समुद्रात जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमधील अनेक मच्छी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात माशांची आवक झाल्याचे दिसून येत आहे. तसेच हे मासे खरेदी करण्यासाठी ग्राहकही गर्दी करताना दिसत आहेत. बाजारात मच्छी येण्यासाठी अजून नारळी पौर्णिमेचा अवधी आहे. मात्र तरीही मुंबई आणि उपनगरातील काही मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मासे विक्रीसाठी येऊ लागले आहेत. पावसाळ्यात आणि नारळी पौर्णिमा अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारात ही मासोळी आली कशी? याला कारण आहे कोरोना. चार महिने उपासमार झाल्यानंतर आता कोणताच पर्याय नसल्यामुळे कोळी बांधवांनी आपला जीव धोक्यात घालून समुद्रात आपल्या बोटी नेल्या आणि आपल्या उपजीविकेसाठी त्यांनी मासे पकडून आणली जात आहे. पावसाळ्यात समुद्राला उधाण येतं, वादळीवाऱ्यामुळं आणि जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्र खवळलेला असतो. यावेळी कोळी बांधव आपली नौका समुद्रात घालत नाहीत. नारळी पौर्णिमा आली की कोळी समाज्यातील सर्वच नागरिक समुद्रावर जाऊन समुद्रदेवतेला नारळ वाहून समुद्र शांत ठेवण्याची प्रार्थना करतात आणि वर्षभर माशांच्या रूपाने भरभराट होण्याची प्रार्थना करतात. ही परंपरा वर्षोनुवर्षे सुरू आहे. मात्र या परंपरेला यावर्षी खंड पडला आहे. कोरोनामुळे गेल्या 4 महिन्यापासून घरात बसून रहावं लागलं, या कालावधीत कोळी समाजाला मासेमारी करता न आल्यामुळे सध्या घर चालवणं मुश्किल झालं आहे. कोणताच पर्याय नसल्यामुळे अनेक कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेअगोदरच आपल्या उपजीविकेसाठी खवळलेल्या समुद्रात आपल्या बोटी घातल्या आहेत. त्यातून मिळणाऱ्या मच्छीची विक्री करून ते आपल्या कुटुंबाला आधार देत आहेत. काय आहे परंपरा
- कोळी बांधव 12 महिन्यांपैकी 9 महिने समुद्रात मासेमारी करतात
- पावसाळ्यातील 3 महिने समुद्राला उधाण असल्यामुळे समुद्रात जात नाहीत
- जून ते ऑगस्ट हे तीन महिने समुद्रातील छोट्या माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतात
- या तीन महिन्यात बोटींची डागडुजी करणं, झाळ्याची बांधणी करणं, अशी कामे सुरू असतात
- नारळी पौर्णिमेनंतर पारंपरिक पद्धतीनं समुद्र देवतेची पूजा करून कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात
आणखी वाचा























