Devendra Fadanvis : नायगाव BDD चाळीच्या विकासाचं काम 1 जानेवारीपासून सुरू, देवेंद्र फडणवीसांनी घेतला कामाचा आढावा
BDD Chawl Redevelopment : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस गृहनिर्माणाचा आढावा घेत प्रशासनाला काही निर्देश दिले.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज BDD चाळीच्या कामांचा आढावा घेतला. बीडीडी पुनर्विकास कार्यक्रमात एकूण 195 चाळी मिळून 15,593 सदनिका निर्माण होणार आहेत. यामध्ये वरळी चाळीच्या विकासाचं काम सुरू झाले आहे. तर नायगाव चाळीच्या विकासाचं काम 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकासामध्ये 2,896 पोलिस क्वार्टर्स बांधकामाचं काम सुरू आहे. याचाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आढावा घेतला
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासनाला दिलेले निर्देश
- पात्रतेचे विषय तातडीने निकाली काढा, जी तारीख ठरवाल त्या तारखेपर्यंत निर्णय झालेच पाहिजेत, अशी कामाची दिशा ठेवा.
- भाडे आधीच देऊन स्थलांतर करून तातडीने काम सुरू होतील, हे सुनिश्चित करा.
- कोविडसाठी ताब्यात घेतलेले निवारे रिकामे करा आणि स्थानांतराच्या कामाला वेग द्या.
पोलिस गृहनिर्माण आढावा घेताना उपमुख्यमंत्र्यांनी काही निर्देश दिले. मेंटेनेंस, सर्टिफिकेशनसाठी आऊटसोर्सिंगची चांगली यंत्रणा उभी करा. त्याची तातडीने देखभाल आणि दुरुस्ती व्हावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच 15 प्रकल्पांचे लवकरच हस्तांतरण करा आणि यातील10 प्रकल्प आगामी 6 महिन्यात तयार होतील याकडे लक्ष द्या असे निर्देश त्यांनी दिले.
वरळी पोलिस वसाहत: तातडीने कामाला गती द्या, मार्केट अॅनालिसिस झालेले आहे असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी प्रशासनाला आदेश दिले.
पोलिस स्थानके अद्ययावत करा आणि त्यातून रिकाम्या जागांचा विचार करून अगदी शक्य त्या ठिकाणी हाउसिंगची कामे सुद्धा करा असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले. पोलिसांसाठी जी कोणती बांधकामे होत असतील, त्या प्रत्येक इमारतीत घरांचे नियोजन करा. मुंबईत किमान 10 एकरची जागा निश्चित करून तातडीने नवीन कारागृह निर्मितीचा विचार करा असेही निर्देश त्यांनी दिले.
पोलिसांना 15 लाखात घरं
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांच्या घरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना नाममात्र दरात घरं देण्यात येणार आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकासात (BDD Chawl Redevelopment) पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली होती. यापूर्वी पोलिसांच्या घरांच्या किमतीवरुन ठाकरे सरकारवर तत्कालिन विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली होती.