Bank Strike | बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप मागे
ऑल इंडिया बँक ऑफिसर कंफेंड्रेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर असोशिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या मुख्य संघटनांनी हा संप पुकारला होता.
मुंबई : बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. सरकारच्या राष्ट्रीय बँकांच्या विलिनीकरणाबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात व आपल्या इतर मागण्यांसाठी 4 बँक अधिकारी संघटांनी येत्या 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. बँक संघटनांच्या मागण्याबाबत अर्थ सचिव राजीव कुमार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्रसिद्धीपत्रक काढून देण्यात आली आहे.
चार विविध बँक अधिकारी संघटनांनी 26 आणि 27 सप्टेंबरला हा संप जाहीर केला होता. त्यामुळे 26, 27 सप्टेंबर आणि पुढे चौथा शनिवार आणि रविवार सुट्यामुळे 5 दिवस या बँक बंद राहणार होत्या. त्यामुळे ग्राहकांची पंचाईत होणार होती. मात्र आता बँका सुरु राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सरकारने 10 बँकांचं 4 बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात हा संप ऑल इंडिया बँक ऑफिसर कंफेंड्रेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर असोशिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या मुख्य संघटनांनी हा संप पुकारला होता.
बँकांचे विलिनीकरण करण्यात येऊ नये, पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा, रोख व्यवहारांची वेळ कमी करण्यात यावी अशा विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.