Antilia bomb scare : मिरारोड-वसई येथील फार्महाऊसवर रचला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ अँटिलियाजवळ उभी करण्याचा कट
अँटिलिया जवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास जेव्हा मुंबई पोलिसांकडे होता, तेव्हा सचिन वाझे (Sachin Vaze) हे या तपासाचा मुख्य अधिकारी होते. या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिली अटक ही सचिन वाझे यांनाच करण्यात आली. त्याचबरोबर रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई : 25 फेब्रुवारी रोजी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या मुंबईतील निवासस्थाना जवळ स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना याप्रकरणी अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणी अनेक महत्त्वाचे खुलासे झाल्यामुळे सध्या या प्रकरणावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. अंबानींच्या निवासस्थानाबाहेर उभी करण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यासंदर्भातील प्लानिंग मीरा रोड आणि वसई या दोन्हीच्या मध्ये असलेल्या एका फार्म हाऊसवर झाल्याची माहिती माहिती एनआयएच्या हाती लागली आहे.
अँटिलिया जवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास जेव्हा मुंबई पोलिसांकडे होता, तेव्हा सचिन वाझे हे या तपासाचा मुख्य अधिकारी होते. मात्र हा तपास जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएकडे सोपवण्यात आला. त्यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिली अटक ही सचिन वाझे यांनाच करण्यात आली. त्याचबरोबर रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झाली आहे.
फार्म हाऊसवर प्लानिंग करण्यासाठी पार पडलेल्या बैठकीत सचिन वाझे आणि विनायक शिंदे हे दोघे प्रामुख्यानं उपस्थित होते. तसेच त्यावेळी या कटात सहभागी असलेल्या इतर व्यक्तीही त्याठिकाणी उपस्थित होत्या. आता याच लोकांचा शोध एनआयए घेत आहे. प्लानिंग करण्यासाठी पार पडलेल्या बैठकीचं सीसीटीव्ही फुटेजही एनआयएच्या हाती लागलं आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारावर एनआयए कटात सहभागी असलेल्या इतर व्यक्तिंचा शोध घेत आहे.
नेमकं काय कट रचण्यात आला होता बैठकीत?
- अँटीलिया जवळ स्कॉर्पिओ उभी करण्यात आली होती, ती कशी उभी करायची?
- स्कॉर्पिओ उभी करण्यासाठी कोणत्या गाड्यांचा वापर करायचा?
- ज्या खोट्या नंबर प्लेट वापरण्यात आल्या होत्या त्या कुठे आणि कशा बनवायच्या?
- कोणावर काय जबाबदारी सोपवायची?
सध्या एनआयए याप्रकरणी कसून चौकशी करत असून येत्या काळात या लोकांची ओळख पटवून त्यांना चौकशीसाठी बोलावून घेतलं जाणार आहे. आत्तापर्यंत केलेल्या तपासात एनआयएला ज्या लोकांवर संशय आहे, त्याच व्यक्ती या बैठकीला उपस्थित होत्या, अशी माहिती एनआयएला मिळाली आहे. या लोकांपर्यंत एनआयए पोहोचली तर या कटात सहाभागी असणाऱ्या बहुतांश व्यक्ती एनआयएच्या जाळ्यात येतील.
तर दुसरीकडे सचिन वाझे यांची एनआयए कोठडी आज संपत आहे. न्यायालयाने सचिन वाझे यांना 9 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली होती. एनआयएने सचिन वाझे यांची चार दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने दोन दिवसांची कस्टडी एनआयएला दिली. त्यामुळे आता ही माहिती न्यायालयासमोर ठेवून सचिन वाझे यांची कोठडी वाढून मागण्यासाठी एनआयए प्रयत्न करू शकते.
त्यामुळे येणाऱ्या दिवसात एनआयए (NIA) कोणा-कोणाची चौकशी करणार हे पाहणं, महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या बैठकीत कोण उपस्थित होतं याचाही तपास एनआयए युद्ध पातळीवर करत आहे. तर मनसुख हिरण हत्या प्रकरणीसुध्दा या बैठकीत उपस्थित असलेल्या या लोकांचा काही सहभाग होता का? याचाही तपास एनआयए करणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
