Raj Thackeray : राज ठाकरे मिरा रोडला जाणार, मनसेचा मेगा प्लॅन तयार, विश्वसनीय सूत्रांची माहिती
Mira Bhayandar Morcha : मिरा रोडमध्ये सुरुवातीला अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. त्यानंतर मराठी संघटनांनी अस्मिता मोर्चाने त्याला प्रत्युत्तर दिलं.

मुंबई : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मिरा रोडमध्ये मराठी भाषकांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनसेकडून आता मोठं पाऊल टाकलं जाणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मिरा रोडला भेट देणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे येत्या काळातही मराठी अस्मितेचा मुद्दा हा राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता थेट राज ठाकरे रस्त्यावर उतरणार अशी शक्यता ही वर्तविण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच राज ठाकरे मिरा रोडला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे.
मनसैनिक आक्रमक
मराठीच्या मुद्द्यावरून मिरा रोड-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला. मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीने हा मोर्चा काढला होता. सुरुवातीला या मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पहाटे तीन वाजल्यापासून ताब्यात घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. अविनाश जाधव यांनाही पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मंगळवारी दिवसभर मनसैनिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली.
मराठी-अमराठी संघर्ष तीव्र
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मराठी आणि अमराठी हा संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी मीरारोडमध्ये पाहायला मिळाला. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावणाऱ्या मनसेविरोधात, गुरूवारी परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीनं विराट मोर्चा काढला.
नेमकं काय घडलं?
मराठी बोलण्याच्या मुद्यावरुन 29 जून रोजी त्याच भागातील एका दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटकावलं. याचा निषेध म्हणून 3 जुलैला याच परिसरातील दुकानदारांनी दुकानं बंद ठेवून मोर्चा काढला होता. या मोर्चात मराठी लोकांच्या विरोधात काही विखारी भाषणंही झाली. आपली दुकानं बंद ठेवून या मराठी लोकांना धडा शिकवूया वगैरे अशी भूमिका मांडली गेली.
दुसरीकडे, अशा वातावरणात भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी तर मराठी माणूस आमच्या पैशावर जगतो, महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, तुम्हाला आपटून आपटून मारु अशी भाषा केली. त्यामुळे मराठी जनमानस संतप्त होतं. या असंतोषाला वाट मिळाली ती मिरा रोडच्या मोर्चात. या मोर्चाला मराठी लोकांनी भरभरून पाठिंबा दिल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा:























