Pratap Sarnaik : मला कुणीही अडवलं नाही, मला अडवणाऱ्याला भीक घालत नाही; मोर्चेकरांच्या घोषणाबाजीवर प्रताप सरनाईकांचं उत्तर
Pratap Sarnaik On Mira Bhayandar Morcha : परप्रांतिय व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मिरा भाईंदरमध्ये मराठी माणूस एकवटल्याचं दिसून आलं.

मुंबई : मिरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोर्चेकरांनी राज्याचे मंत्री प्रताप सरनाईकांना विरोध केला आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चेकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर प्रताप सरनाईक या मोर्चातून माघारी फिरले. त्यांनी या मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला. मला कुणीही अडवलं नाही, मला अडवणाऱ्याला भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईकांनी दिली. अशांना तोंड द्यायला प्रताप सरनाईक हा सक्षम आहे असंही ते म्हणाले.
मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्द्याला विरोध करत परप्रांतिय व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी एक मोर्चा काढला होता. त्यामध्ये त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून होणाऱ्या मारहाणीला विरोध केला होता. त्याचवेळी मराठी माणसाच्या विरोधात त्यातील काही व्यापाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळे या व्यापाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मराठी लोकानी मिरा भाईंदरमध्ये एक विराट मोर्चा काढला.
प्रताप सरनाईकांच्या विरोधात घोषणाबाजी
मीरारोडमध्ये अखेर मनसे आणि शिवसेनेचा मोर्चा निघाला. दोन तासांच्या राड्यानंतर अखेर हा मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे ज्या मार्गावरून मोर्चा काढण्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, त्याच मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रताप सरनाईकांना मोठ्या नामुष्कीला तोंड द्यावं लागलं. प्रताप सरनाईकांना मोर्चेकऱ्यांनी अक्षरशः मोर्चातून हुसकावून लावलं. त्यांच्यासमोर 'पन्नास खोके एकदम ओके'च्या अशा घोषणाही दिल्या. त्यामुळे प्रताप सरनाईकांना या मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला.
मला अडवणाऱ्यांना भीक घालत नाही
मोर्चेकरांच्या भूमिकेवर बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, "मला कुणीही अडवले नाही. मला अडवणाऱ्यांना मी भीक घालत नाही. त्यांना तोंड द्यायला प्रताप सरनाईक सक्षम आहे. गेली 20 वर्षे या विभागाचे मी प्रतिनिधीत्व करतोय. त्यामुळे मला काही फरक पडत नाही."
प्रताप सरनाईकांचा पोलिसांना प्रश्न
मराठी माणसांच्या मोर्चाला विरोध करण्याची पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं होतं. तसेच आपण या मोर्चामध्ये सामील होणार, पोलिसांना अटक करायची तर करावी असंही ते म्हणाले होते.
व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी दिली, मग मराठी एकीकरण समितीला परवानगी का नाही असा प्रश्न प्रताप सरनाईक यांनी विचारला होता. गृहखात्याचे आदेश नव्हते तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली असाही प्रश्न त्यांनी विचारला.
ही बातमी वाचा:























