(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitesh Rane : आमदारांना वाचवायचा प्रयत्न करला तर तुमची खैर नाही, हायकोर्टाचा कणकवली पोलिस आणि वकिलांना थेट इशारा
Mumbai High Court : कोकण रेल्वेत मुस्लिम कुटुंबीयाला 'जय श्री राम' बोलण्याची सक्ती केल्याच्या प्रकरणी कणकवलीचे भाजपचे आमदार नितेश राणेंच्या अडचणी कायम आहेत.
मुंबई: कोकण रेल्वेवरील मडगाव एक्सप्रेसनं कणकवली येथून मुंबईत येताना एका मुस्लिम कुटुंबाला 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्याचा आग्रह केल्याच्या प्रकारणात आमदार नितेश राणेंच्या (Nitesh Rane) अडचणी कमी होत नाहीयत. या प्रकरणी जर आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न कराल तर त्याची किंमत कणकवली पोलीसांना चुकवावी लागेल या शब्दांत हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलंय.
या प्रकरणाशी नितेश राणेंचा संबंध नसून ते तिथं आपल्या वेगळ्या कामाकरता आले होते. असं स्पष्टीकरण सरकारी वकिलांनी कोर्टात दिलं. मात्र जर नितेश राणेंनी पोलीस ठाण्यात येऊन कुुुटुंबाला धमकावल्याचा एक जरी पुरावा सादर झाला तर तुमची खैर नाही, या शब्दांत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय. याचिकाकर्त्यांना आपल्या आरोपांबाबत एक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत हायकोर्टानं सुनावणी दोन आठवड्यांकरता तहकूब केलीय.
भयभीत झालेल्या या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश यापूर्वीच हायकोर्टानं जारी केलेत. जास्मीन शेख व आसीफ अहमद शेख यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शेख कुटुंबासोबत घडलेली ही घटना अतिशय वेदनादायी आहे, असं निरीक्षण नोंदवत याप्रकरणाचा योग्य तपास करून आरोपींविरोधात गुन्हा नोंदवा, असेही निर्देशही मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहे.
काय आहे प्रकरण?
चेंबूर येथील रहिवासी असेललं शेख कुटुंबुय जानेवारी 2024 मध्ये हे एका धार्मिक उत्सवासाठी सिंधुदुर्गातील कणकवलीत गेलं होतं. 19 जानेवारी 2024 रोजी मडगाव एक्सप्रेसनं ते मुंबईला परतत होते तेव्हा या प्रवासात ही घटना घडली. 30 ते 40 महाविद्यालयीन तरुणांचा एक ग्रुप त्यांच्याच डब्यातनं प्रवास करत होता. हा ग्रुप मोठ-मोठ्याने गाणी म्हणत होता. आसिफ यांच्यासोबत त्यांच्या दोन लहान मुलीही होत्या. माझ्या मुलींना त्रास होतोय. जोरजोरात गाणी म्हणू नका, अशी विनंती आसिफ यांनी वारंवार या तरुणांना केली. तेव्हा त्यातील एक तरुण पुढे आला व त्याने आसिफ यांना त्यांची जात विचारली. आसिफ यांनी मुस्लिम असल्याचं सांगताच त्या तरुणांनी त्यांच्यावर 'जय श्री राम' म्हणण्यासाठी दबाव टाकण्यास सुरूवात केली.
आसिफ यांनी तसं करण्यास नकार दिला. तेव्हा त्या तरुणांनी त्यांना शिवीगाळ केली. शेख कुटुंबानं याची तक्रार लागलीच रेल्वे पोलिसांकडे केली. रेल्वे पोलिसांनी सहा तरुण व एका तरुणीला ताब्यात घेतलं. तेव्हा त्यातील एकजण पळून गेला. मात्र पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवला नाही, उलट आम्हालाच धमकावलं. याशिवाय एका तरुणानं माझ्या मुलीच्या तोंडावर चहा फेकला. तसेच 'जय श्रीराम' म्हणा अन्यथा पाकिस्तानला निघून जा, अशी धमकीही या तरुणांनी दिली होती. राजकीय दबावापोटी याचा तपास कणकवली पोलिसांकडूे वर्ग करण्यात आला आहे. असा आरोपही या याचिकेतून करण्यात आलाय.
नितेश राणेंचा राजकीय दबाव
भाजप आमदार नितेश राणेच्या सांगण्यावरून हा तपास कणकवली इथं वर्ग करण्यात आला. त्यानंतर आम्हाला धमकावण्यासाठी काहीजण आले होते. आम्ही नितेश राणेची माणसे आहोत, तुम्ही नितेश राणे यांच्याविरोधात काही केलंत तर तुम्हााल ठार मारु, अशी धमकीही त्यांनी दिली. पोलीस आम्हाला जेव्हा कणकवली पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेव्हा तिथं 200 ते 300 जणांचा जमाव उभा होता. जे 'जय श्रीराम'च्या घोषणा देत होते. तसेच तक्रार मागे घेण्यासाठी नितेश राणेंनी पोलिसांसमोरच आम्हाला धमकावलं, असा आरोपही कुटुंबानं याचिकेतून केला आहे.
ही बातमी वाचा: