Mumbai Ganesh Visarjan : जुहू बीचवर वीज कोसळली, विसर्जनासाठी असलेल्या स्वयंसेवकाचा जागेवरच मृत्यू
Ganesh Visarjan : जुहू चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी प्रशासनाच्या मदतीसाठी असलेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : मुंबईत गणेश विसर्जनाचा उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे एक दुर्देवी घटना घडली आहे. जुहू चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी प्रशासनाच्या मदतीसाठी असलेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. त्याचवेळी 16 वर्षीय स्वयंसेवक हसन शेख याच्यावर वीज कोसळली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मुंबईत गणेश विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर मोठी गर्दी उसळते. त्या अनुषंगाने या ठिकाणी मुंबई महापालिका आणि इतर यंत्रणांकडून गणेश भक्तांच्या गर्दीचे नियोजन करणे, विसर्जनासाठी मदत करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी स्वयंसेवकदेखील उपस्थित आहेत. दुपारच्या सुमारास मुंबईत वीजांच्या कडकडाट झाला होता. त्याच दरम्यान वीज कोसळली होती. यात 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईत सर्वत्र गणेश विसर्जन सुरू असताना मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावरून ही धक्कादायक घटना पुढे आली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या 16 वर्षीय मुलाचे नाव हसन युसूफ शेख असे आहे. सायंकाळी 4.50 वाजण्याच्या सुमारास एकजण समुद्रात बुडत असल्याचे दिसले. त्याच क्षणी जीवरक्षकांनी समुद्रात उडी घेत त्याला पाण्याबाहेर काढले. जखमी अवस्थेत असलेल्या या युवकाला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
मुंबई महापालिकेची तयारी
मुंबई महापालिकेने (BMC) यंदाही जय्यत तयारी केली आहे. उद्या, गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) मुंबई महापालिकेचे 10 हजार कर्मचारी झटत आहेत. गणेश भक्तांच्या सोयीसाठी 71 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्याशिवाय, घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी 198 कृत्रिम तलावही तयार करण्यात आले आहेत. घरगुती बाप्पांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येत आहे. अनेकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाच्या विसर्जनाला प्राधान्य दिले आहे.
मुंबई महापालिकेच्या मदतीला स्वयंसेवी संस्थादेखील आहेत. समुद्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या गणेश भक्तांवर कोणताही दुर्दैवी प्रसंग येऊ नये तसेच नागरिकांच्या हितासाठी 764 जीवरक्षक मुंबई महापालिकेकडून तैनात करण्यात आले आहेत. महापालिकेकडून 48 मोटरबोटी तैनात केल्या आहेत. आरोग्य विभागाकडून 75 प्रथमोपचार केंद्रांसह 61 रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासह प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.