Kurla Bus Accident : कुर्ला अपघातातील बेस्टचा ड्रायव्हर दारू प्यायलेला होता का? बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी सांगितली मोठी माहिती
Kurla Bus Accident : बेस्टची 332 नंबरच्या बसचा अपघात झाला असून त्यामध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 48 जण जखमी झाले आहेत.
मुंबई : कुर्ला एलबीएस मार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. हा अपघात ज्यावेळी झाला त्यावेळी ड्रायव्हर संजय मोरे याने मद्यपान केलं नव्हतं असं बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल दिग्गीकर यांनी सांगितलं. पोलिसांच्य तपासामध्येही अशी काही गोष्ट आढळली नाही. आता या प्रकरणी दोन समित्या स्थापन केल्या असून त्याचा अहवाल येत्या दोन दिवसात सादर केला जाईल अशी माहितीही अनिल दिग्गीकर यांनी दिली.
बेस्ट बसचे महाव्यवस्थापक अनिल दिग्गीकर म्हणाले की, अपघात होताना चालकाने मद्यपान केल होतं अस कुठही निदर्शनास आलं नाही. पोलिसांच्या अहवालात देखील असं काही नमूद नाही. तो नवीन ड्रायव्हर नाही. याआधी देखील त्याने ड्रायव्हिंग केल आहे. चार वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्याने काम केलं आहे.
Best Committee On Kurla Bus Accident : दोन समिती स्थापन
या प्रकरणी अधिक माहिती देताना अनिल दिग्गीकर म्हणाले की, या अपघाताची चौकशी करण्यासाठी तात्काळ दोन समित्या स्थापन केल्या आहेत. एका समितीमध्ये दोन आरटीओ अधिकारी आणि बेस्ट प्रशासनाचा एक अधिकारी आहे. ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करेल. यामधे गाडी सदोष होती की ड्रायव्हरची काही चूक होती याची माहिती ते देतील. दुसरी समिती प्रामुख्याने जखमीच्या आणि मृतांचा नातेवाईकांना क्लेमचे पैसे लवकर मिळावेत यासाठी काम करेल.
दरम्यान, राज्य शासनाने मृतांसाठी 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. बेस्टकडून दोन लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे. तसेच जखमीच्या उपचाराचा पूर्ण खर्च आम्ही करू अशी माहिती अनिल दिग्गीकर यांनी दिली.
अपघातात 48 जखमी, सात जणांचा मृत्यू
सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये एका भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडला. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे.
बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
दारुचं व्यसन नाही, पत्नीचा दावा
बेस्ट बस अपघातप्रकरणातील आरोपी बसचालक संजय मोरे कोणतीही नशा करत नाहीत असा दावा त्याच्या पत्नीने केला आहे. त्याचे वडील हे गेल्या 35 वर्षांपासून गाडी चालवतात. मात्र कोणताही अपघात झाला नसल्याची माहितीही देण्यात आली.
दरम्यान, अपघात झालेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि तज्ज्ञांशी साधला संवाद साधला. त्यामध्ये अपघातग्रस्त बसचा ब्रेक फेल झाल्याचा दावा खोटा असल्याचं समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ड्रायव्हर-कंडेक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
कुर्ला अपघातप्रकरणी बेस्ट अधिकारी आणि कंत्राटदाराच्या चौकशीची शक्यता आहे. ड्रायव्हर संजय मोरेला मिनी बस, इतर गाड्या चालवण्याचा अनुभव होता. मात्र मोठी बस चालवण्याचा अनुभव नसल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. ड्रायव्हर संजय मोरे याच्यासोबत आता कंडक्टर सिद्धार्थ मोरेवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: