12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
बीड प्रकरणावरुन खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.
बीड : जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांडावरुन राज्यातील वातावरण तापलं असून मस्साजोग गावात आज धनंजय देशमुख यांनी टीकावर चढून आंदोलन केले. मात्र, मराठा आदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीवरुन त्यांनी आपले आंदोलन स्थगित केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आज या आंदोलनवरुन गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang sonawane) यांनी बीडमधील पोलीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी आमदार सुरेश धस यांनी खंडणीसाठी वाल्मिक कराड आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांची मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) बंगल्यावर बैठक झाल्याचा आरोप केला होता. आता, बजरं सोनवणे यांनीही धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड व पोलीस अधिकाऱ्याची बैठक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे खूनप्रकरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बैठक झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
बीड प्रकरणावरुन खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर मी पहिल्याच बाईटमध्ये मीडियाला म्हटलं होतं की, तिसऱ्या आरोपींचं कनेक्शन धाराशिवमार्गे पुण्याला लागतंय का बघा, कारण माझ्या बोलण्यामागे काही लॉजिक होतं. आज हा आरोपी धाराशिवमार्गे पुण्याला गेल्याचं सापडलं. खंडणीतील आरोपी पुण्याला सरेंडर होतो, तो म्हणतो मी इकडं गेलो, तिकडं गेलो. खंडणीच्या आरोपीवर 11 तारखेला गुन्हा दाखल झाला. मात्र, 12 तारखेला बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक झाली. माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर, त्यांच्या ऑफिसमध्ये खंडणीतील आरोपी अन् पोलीस अधिकारी यांची भेट झाली. म्हणजे, पोलिसाला तिथं मध्ये बसवून तो निघून गेला का? असा सवाल बजरंग सोनवणेंनी उपस्थित केला. विशेष म्हणजे बजरंग सोनवणेंनी थेट नाव घेतलं नसलं तरी बीडचे माजी पालकंमंत्री म्हणत थेट धनजंय मुंडेंवरच गंभीर आरोप केले आहेत.
12 डिसेंबरला बीडचे पालकमंत्री व खंडणीखोर आरोपीची पोलिस अधिकाऱ्यासोबत बैठक झाली. विशेष म्हणजे वाल्मिक कराडला पोलिसांची सुरक्षा आहे, तो कुठल्या पदावर आहे हे मला माहिती नाही. पण, त्यांनाही पोलीस गार्ड आहेत, हे गार्ड आरोपीसोबत कसे काय? असे सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. 11 डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून आरोपीला कोणी-कोणी मदत केली. 31 डिसेंबरला अटक होईपर्यंत 21 दिवस आरोपीला ज्यांनी मदत केली, त्यांना सह-आरोपी का केलं जात नाही, असेही सोनवणेंनी म्हटलं आहे.
एसआयटीतील नावेही आरोपीच्या सांगण्यावरुन
एसआयटी कधी नेमली गेली हेही तुम्ही पाहा, ज्या दिवशी आरोपी पोलिसांना शरण येतो. त्याच दिवशी एसायटी गठीत केली जाते, एसआयटीच्या टीमची नावे समोर येतात. म्हणजे, आरोपीला जे हवे ते पोलीस अधिकारी, कर्मचारी एसआयटीमध्ये घेतले गेले. राज्यपालांकडून एसआयटीतील अधिकाऱ्यांची नावे निश्चित केल्यानंतरच आरोपी पोलिसांना अटक झाला, असा गंभीर आरोप खासदार सोनवणेंनी केला आहे.
हेही वाचा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं