Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड या प्रकरणात नसेल तर महाराष्ट्राला समोर येऊन सांगा की वाल्मिक कराड यात नाही. पण तुम्ही लपवता कशाला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय.
Jitendra Awhad on Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड या प्रकरणात नसेल तर महाराष्ट्राला समोर येऊन सांगा की वाल्मिक कराड यात नाही. पण तुम्ही लपवता कशाला? लोकांना अंधारात का ठेवताय? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. तसेच, तक्रार करायचो आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) बाहेर यायचा, म्हणून लोक तक्रार करायला घाबरत आहेत. ज्याप्रमाणे शेतकरी समोर आलेत तसं जेव्हा कराडला मोक्का लागेल किंवा ज्यादिवशी त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल होईल, तेव्हा अजून 50 खुनाचे प्रकार समोर येतील, असा खळबळजनक आरोप देखील त्यांनी केलाय.
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) पोलिसांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. तसेच या हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज मस्साजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. तब्बल दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
शीना बोरा हत्या प्रकरणात का माहिती देत होते?
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्यांची अस्वस्थता आणि त्यांच्या मनातला गोंधळ मी समजू शकतो. सरकारने जे काही चालवलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. या खुनाचा तपास कुठपर्यंत आलाय? कसा आलाय? हे सरकार का लपवतंय? हेच समजत नाही. सरकार सांगत असेल की, हे सर्व गुप्त आहे तर माझा सरकारला एक प्रश्न आहे की, मी महाराष्ट्राच्या लक्षात आणून देतो, शीना बोरा हत्या प्रकरण घडलं होतं त्यात यांना एका आयपीएस ऑफिसरच नाव बदनाम करायचं होतं, त्या ऑफिसरच नाव राकेश मारिया आहे. त्यावेळी हे दररोज प्रेस कॉन्फरन्स घेत होते. माहिती देत होते तेव्हा का बरं? असं करत होतात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
लोकांना अंधारात का ठेवताय?
ते पुढे म्हणाले की, इतकी निर्घृण हत्या झाल्यानंतर तुम्हाला का लपवावे, असे वाटते आहे? वाल्मिक कराड या प्रकरणात नसेल तर महाराष्ट्राला समोर येऊन सांगा की वाल्मिक कराड यात नाही. पण तुम्ही लपवता कशाला? लोकांना अंधारात का ठेवताय? हे कुटुंब जेव्हा पोलिसांकडे जातात तर एक पोलीस अधिकारी त्यांच्या समोर सांगतो की वाल्मिक कराडला काही होऊच शकत नाही. मग कस हे कुटुंब डिस्टर्ब होणार नाही? असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
सरकारमध्ये माणुसकी आहे की नाही?
या सरकारला नेमक करायचं तरी काय? या सरकारला जिल्हा परिषदेचे राजकारण तर नाही दिसत आहे ना? की परत एकदा ओबीसी, मराठा पेटवून देऊ आणि आपापली जिल्हा परिषद काढून देऊ आणि संपवून टाकू. सगळीकडे हे सरकार राजकारण करत असेल तर यांची मानसिकता काय आहे, या सरकारमध्ये माणुसकी आहे की नाही? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
तेव्हा आणखी 50 खुनाचे प्रकार समोर येणार
मायबाप सरकार आपण म्हणतो पण यात माय पण नाही आणि बाप पण नाही. देशमुख कुटुंबियांनी सांगावं की त्यांना धमकीचे फोन कोणाचे येत आहेत? काही लोकांनी घरच्यांवर दबाव टाकला आहे की कराडच्या मागे जास्त लागू नका. मला कळत नाही कराड एवढा कुठला मोठा गुंड आहे की तो सरकारपेक्षा मोठा आहे. बहुचर्चित हार्वेस्टर भ्रष्टाचाराचा जो आता आरोप होतोय त्याचे सर्व पैसे कराडने घेतले, असं शेतकरी सांगत आहेत तरी गुन्हा का दाखल होत नाही? अजित दादा आपण शेतकरी आहात. आपण नेहमी बळीराजाबद्दल बोलत असतात. बारामतीच्या शेतकऱ्यांकडून त्याने पैसे घेतलेत एवढी हिंमत तुमच्या मंत्र्याची आहे. तरी तुम्ही त्याला पाठीशी घालताय, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. तक्रार करायला लोक घाबरत आहेत. कारण तक्रार करायचो आणि कराड बाहेर यायचा, ज्याप्रमाणे शेतकरी समोर आलेत तसं जेव्हा कराडला मोक्का लागेल किंवा ज्यादिवशी त्यावर 302 चा गुन्हा दाखल होईल तेव्हा अजून 50 खुनाचे प्रकार समोर येतील, असा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला.
आणखी वाचा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं