Arun Gawli : डॉन अरुण गवळींची कन्या भाजपच्या वाटेवर? महापालिका निवडणुकीत मोठी घडामोड, गिता गवळी-आशिष शेलारांची भेट
Geeta Gawli Meet Ashish Shelar : लोकसभा निवडणुकीत गिता गवळींनी भाजपचा पाठिंबा दिला होता. विधानसभेला त्या ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या.

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कन्या गिता गवळी यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यामुळे अरुण गवळींचा पक्ष महापालिका निवडणुकीत भाजपची साथ देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गीता गवळी या अरुण गवळीची कन्या असून त्या 2017 ला मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका होत्या. लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा भाजपला दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीला गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून इच्छुक होत्या. मात्र ठाकरे गटाने त्यांना तिकीट न दिल्याने गीता गवळी निवडणूक लढल्या नाहीत.
Geeta Gawli : गिता गवळींना सोबत घेण्यासाठी भाजपकडून हालचाली?
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सध्या तुरुंगात असून त्याची कन्या गिता गवळी या राजकारणात आहेत. गिता गवळी याच अखिल भारतीय सेना (Akhil Bharatiya Sena) या पक्षाची धुरा सांभाळत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश दिले असताना आता निवडणूक लवकरच होणार आहे हे स्पष्ट झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे गिता गवळी यांनी आशिष शेलार यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय. महापालिका निवडणुकीसाठी अरुण गवळीच्या पक्षाचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जात असल्याचंही स्पष्ट होतं आहे.
Mumbai Gangster Arun Gawli : अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग
दक्षिण मुंबईमधील लालबाग, परळ, भायखळा, करीरोड, दगडी चाळ, सातरस्ता, माजगाव या भागात अरूण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे. हा वर्ग आपल्याकडे वळवण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असल्याचं चित्र आहे. सन 2004 साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरुण गवळीने शिवसेनेच्या मोहन रावले यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. तर त्यावेळचे राष्ट्रवादीचे नेते आणि अरूण गवळीचे भाचे सचिन अहिरही त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी अरूण गवळीला 92 हजार मते मिळाली होती.
सचिन अहिर आणि अरुण गवळी यांना मिळालेल्या मतांचा आकडा हा निवडून आलेल्या सेनेच्या मोहन रावले यांच्या मतांच्या आकड्यापेक्षा जास्त होता. नेमकी हीच बाब लक्षात घेत महायुतीने गवळींच्या पक्षाच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
Kamlakar Jamsandekar Murder Case : कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण नेमकं काय?
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अरूण गवळीला 2007 मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अरूण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. त्यानंतर सदाशिवने गवळीच्या हस्तकांमार्फत त्यांची सुपारी दिली. प्रताप गोडसेला गवळीने या सुपारीची जबाबदारी दिली होती. याप्रकरणी आपलं नाव येऊ नये यासाठी नवे शूटर्स शोधण्यास सांगण्यात आलं होतं.
गोडसेने या कामासाठी श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. या दोघांना अडीच-अडीच लाख रुपये देण्याचं कबुल केलं आणि अॅडव्हान्स म्हणून 20-20 हजार रुपये दिले. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालसोबत जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली. अखेरीस 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच जामसंडेकरच्या राहत्या घरी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
ही बातमी वाचा:























