ठाण्यात 44 किलो गांजा हस्तगत, आरोपी गांजा टाकून फरार
ठाण्यातील कोपरी विभागात तब्बल 44 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत 9 लाखांपेक्षा जास्त आहे.
ठाणे : ठाण्यातील कोपरी विभागात तब्बल 44 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत 9 लाखांपेक्षा जास्त आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हे अंमली पदार्थ कोण आणि कुणासाठी देणार होते हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण हा माल रिक्षात भरत असताना पोलिसांनी हटकले असता, ते आरोपी माल तसाच टाकून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडे गांजाने भरलेल्या एकूण 6 बॅग्स होत्या.
कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक विभागात गस्त घालीत असताना 4 मार्चला पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक साळवी आणि पोलीस शिपाई शेंडगे शास्त्रीनगर बस स्टॉप समोर, ठाणे रेल्वे स्टेशनकडून आनंद सिनेमाकडे जाणाऱ्या मार्गावर गस्त घालत होते. तेव्हा दोन इसम संशयास्पदरित्या 6 बॅग्स घेऊन रिक्षा मध्ये ठेवण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना हटकल्यानंतर त्यांनी बॅग्स मध्ये कपडे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी बॅग्स उघडण्यास सांगताच दोन्ही आरोपींनी त्या बॅग्स तशाच टाकून अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाले. त्यांचा पोलिसांनी पाठलाग केला मात्र ते सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी रिक्षात ठेवलेल्या बॅगेची तपासणी केल्यानंतर सहा बेगमध्ये 44 किलो 664 किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ त्यांना सापडला. या मालाची एकूण किंमत 9 लाख 57 हजार 280 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मात्र या प्रकरणातील आरोपी फरार झाले आहेत. त्यामुळे या मागील सूत्रधार कोण हे अजून कळले नाही. तसेच हा गांजा नेमका कुणाला देण्यात येणार होता ते देखील अजून समोर आलेले नाही. मात्र कोपरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.