(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccine | दिवसाला 1 लाख लसींप्रमाणे 30 लाख लसींचा पुरवठा व्हावा, मुंबई महानगरपालिकेची केंद्राला विनंती
मुंबईत दररोज 1 लाख लसीकरणाचं पालिकेच लक्ष्य आहे. त्याकरता जादा लसींचा पुरवठा आणि अतिरीक्त लसीकरण केंद्रे चालवण्याची परवानगी पालिकेनं मागितली होती.
मुंबई : मुंबईतील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पाहता पालिका प्रशासनानं केंद्राकडे लसीकरण वाढवण्याची परवानगी मागितली आहे. दिवसाला 1 लाख लसींप्रमाणे 30 लाख लसींचा पुरवठा व्हावा आणि अतिरीक्त लसीकरण केंद्रे २४ तास चालवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती मुंबई महानगरपालिकेला केंद्राला विनंती दिली.
मुंबईत दररोज 1 लाख लसीकरणाचं पालिकेच लक्ष्य आहे. त्याकरता जादा लसींचा पुरवठा आणि अतिरीक्त लसीकरण केंद्रे चालवण्याची परवानगी पालिकेनं मागितली होती. सध्या मुंबईत दिवसाला 45,000 लोकांचं लसीकरण होतं आहे. सध्या सुरू असणारी लसीकरण केंद्रे ही 8 ते 12 तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. लसीकरण केंद्रे 24 तास कार्यरत झाल्यास दिवसाला 1 लाख व्यक्तींचे लसीकरण करणे सहज शक्य होईल असा विश्वास मुंबई महापालिकेला आहे.
आणखी 30 रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच शासनाकडे पाठविला आहे. त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही. 60 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे सध्या लसीकरण करण्यात येत आहे. 45 ते 59 या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही लसीकरण सुरू आहे. मुंबईत ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे 30 लाख आहे. ही बाब लक्षात घेतल्यास तसेच दिवसाला 1 लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास साधारणपणे महिनाभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले असेल.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड बाधित रुग्णांची संख्या सध्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज असून संभाव्य गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व 24 विभागांच्या स्तरावर आवश्यक ते सर्व नियोजन सुव्यवस्थित प्रकारे करण्यात आले आहे. हे नियोजन करताना रुग्णालये, आय. सी. यू. खाटा, ऑक्सिजन खाटा, रुग्णवाहिका, मनुष्यबळ, औषधोपचार विषयक सामुग्री इत्यादी सर्व संबंधित बाबींचेही सूक्ष्मस्तरीय नियोजन देखील यापूर्वीच करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :