Corona vaccination | देशात आतापर्यंत दोन कोटी 40 लाख लोकांना कोरोनाची लस, लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग
लसीकरणाच्या 53 व्या दिवशी संध्याकाळी 7 पर्यंत 10 लाख 28 हजार 911 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 98 हजार 354 लोकांना पहिल्यांदा लस देण्यात आली.
नवी दिल्ली : देशात एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येत आहे. देशात आतापर्यंत दोन कोटी 40 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. रिपोर्टनुसार 2,40,37,644 जणांना वॅक्सीन देण्यात आले आहे.
लसीकरणाच्या 53 व्या दिवशी संध्याकाळी 7 पर्यंत 10 लाख 28 हजार 911 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 98 हजार 354 लोकांना पहिल्यांदा लस देण्यात आली. 2 लाख 30 हजार 557 आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्स यांना कोरोनाची लस देण्यात आली. लस घेतलेल्यांपैकी 5 लाख 51 हजार 398 नागरिक हे 60 वर्षापेक्षा जास्त असून 98 हजार 478 हे वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.
कोरोना लसीकरणासाठी कोरोनाच्या संकेतस्थळावर (http://cowin.gov.in) नोंद करणं गरजेचं आहे. तसेच आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते. सरकारच्या या अॅपवर आणि संकेतस्थळावर नोंदणी करताना लोकांनी गर्दी केल्याने काही काळ या अॅप आणि संकेतस्थळाच्या कामामध्ये अडथळा आल्याचंही पहायला मिळालं.
लसीकरणासाठी एखादी व्यक्ती कोणत्याही राज्यात आपले नांव नोंद करु शकते. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.
Corona Alert | 'या' ठिकाणी प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक