(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona | राज्यात आज दिवसभरात 16 हजार 620 कोरोना बाधितांची नोंद, तर 50 रुग्णांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आला आहे. अशातच राज्यात आज एका दिवसात 16 हजार 620 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 50 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज 16 हजार 620 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज नवीन 8 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात 50 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 21 लाख 34 हजार 072 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 126231 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% वर पोहोचलं आहे.
नागपूर जिल्ह्यातही कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. नागपुरात आज दिवसभरात 2 हजार 252 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1033 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या नागपूर जिल्हा आणि शहरात एकूण 16 हजार 630 रुग्ण कोरोना बाधित असून कोरोनावर उपचार घेत आहेत. नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून देशातील सर्वाधिक 10 कोरोना बाधित शहरांच्या यादीत नाशिक जाऊन पोहोचले आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर, नाशिकसह राज्यातील काही शहरांमध्ये वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
नाशिकमध्ये आज देखील कोरोना रुग्णसंख्येने हजारांचा टप्पा पार केला आहे. दिवसभरात जिल्ह्यात 1 हजार 356 नवे रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात 942, नाशिक ग्रामीण भागात 269, मालेगाव मनपा 126, जिल्हा बाह्य 19 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात 523 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 8 हजार 48 बाधितांवर उपचार सुरु आहेत.
कल्याण, डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा कहर
कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 404 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सध्या 3040 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर एका दिवसात 249 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अमरावत जिल्ह्यात दिवसभरात 383 कोरोना बाधितांची नोंद
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात आज 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज नव्या 383 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यात एकूण 42 हजार 497 रुग्णांची नोंद झाली आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
रायगड जिल्ह्यात कोरोना रुगणांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे 235 रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 रुगणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पनवेल तालुक्यात 164 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर रायगड जिल्ह्यात सध्या एकूण 1 हजार 476 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :