SSC-HSC Board Exam | दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
📢 Imp Announcement: Given the current #COVID-19 situation in Maharashtra, we’ve postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams. Your health is our priority. #PariskhaPeCharcha #HSC #SSC #exams (1/5) pic.twitter.com/cjeRZAT7ux
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 12, 2021
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षण विभागाची चर्चा झाली. अशावेळी दहावी बारावी विद्यार्थ्यांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. या दरम्यान लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी जी काही चर्चा झाली ती आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने जो निर्णय घेतल आहे, तो सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्ड यांनी देखील घ्यावा असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
बारावीच्या परीक्षा सुधारित कार्यक्रमानुसारच घ्याव्यात
बारावीच्या परीक्षा घोषित सुधारित कार्यक्रमानुसारच घेतल्या जाव्यात. हे करतांना बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे आय.आय.टी, जेईई आणि नीटच्या परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचे असतात हे लक्षात घ्यावे, त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.
तयारी पूर्ण करा, एसओपी तयार करा
आपण ज्या तारखांना बारावीच्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. केंद्रांची संख्या वाढवावी, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात, मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर (विरळ) बसवावे, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता, त्यांचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे. परीक्षांच्या आयोजनासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे, दरम्यानच्या काळात परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. याची एक परिपूर्ण आणि सुनियोजित कार्यप्रणाली(एसओपी) शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार, शिक्षण विभागाचा निर्णय
पहिले ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाने घेतला. त्याआधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा रद्द झाली असली तरी विद्यार्थ्यांना स्वाध्याय आणि चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने प्रत्येक विषयासाठी स्वाध्याय किंवा चाचणी देऊन त्यांचं मूल्यमापन करण्यात येणार असून त्यानुसारच विदयार्थ्यांचे गुण ठरवले जाणार आहेत, असे पत्र शाळांना मिळाले आहे.
वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या. पण शिक्षण प्रक्रिया चालूच होती. राज्यातील शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू होती. इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासनस्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आणि अजूनही ते सुरू आहेत. आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिक्षा (DIKSHA) आधारित अभ्यासमाला, ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमांचे डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपण सुरू आहे.