Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा हाहाकार! अतिवृष्टीची दाहकता समोर; शेतीसह जनावरांचे मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत
Maharashtra Rain Update : मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड आणिं हिंगोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर शेती पिकांचंही नुकसान झाल्याचं दिसून आलं.

Maharashtra Rain Update : लातूर, बीड, नांदेडसह मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी दमदार पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात तीन दिवसाच्या पावसाने जिल्ह्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली काढलाय. मात्र शेतीच प्रचंड नुकसान झाले असून पावसाने शेतकऱ्यांच्या जनावरांचेही अतोनात नुकसान केलंय. परिणामी शेती आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण मोडून टाकणारा हा पाऊस (Maharashtra Weather) ठरला असून या नुकसानाची दाहकता आता समोर आली आहे.
लातूर जिल्ह्यावर गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील 60 पैकी तब्बल 36 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टी, वीज कोसळणे आणि पूर यामुळे जिल्ह्यात 27 जनावरे व 605 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून, 116 घरांचे नुकसान झाले आहे.
बीडच्या माजलगावचे धरण भरलं; सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
गेल्या काही दिवसापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे बीडच्या माजलगावचे धरण भरल्याने या धरणाचे 3 दरवाजातून 5919 क्यूसेक्सने सिंदफणा नदीपात्रात रात्रीपासून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या धरणात 92 टक्के पाणीसाठा आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील वर्षी धरण 80 टक्केच भरल्याने धरणातून पाणी सोडल्यात आले नव्हते.
पावसामुळे पुलांवरून पाणी वाहत असल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील जवळपास 65 मार्गांवर वाहतूक ठप्प राहिली. मांजरा, रेणा, तेरणा, तावरजा, तिरू या प्रमुख नद्यांसह असंख्य नाले-ओढ्यांना पूर आला आहे. लातूर-धाराशिव-बीड सीमेवरील मांजरा धरण 98 टक्के भरले असून सहा दरवाजांतून विसर्ग सुरू आहे. मांजरा नदीवरच्या 11 बॅरेजेसचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर सर्व प्रकल्प तुडुंब भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शेतीवर मोठे संकट ओढवले आहे. पिके पाण्यात बुडाल्याने काढणीला आलेली शेती वाया जाण्याची भीती आहे. शेतशिवारात पाणी साचल्यामुळे पिके पिवळी पडत असून कुजण्याचा धोका वाढला आहे.
पुराच्या पाण्यातून टँकर नेणं चालकाच्या चांगलंच आलं अंगलट
अकोल्यात नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून टँकर नेणं एक चालकाच्या चांगलंच अंगलट आल्याचं पहायला मिळालंय. रात्री 8 च्या सुमारास अकोला ते गायगाव रोडवरील नाल्यावरून टँकर खाली कोसळलाय. टँकर पुलावरून नाल्यात कोसळतांनाचा ''व्हिडीओ 'माझा'च्या हाती लागलाय. हा टँकर अकोल्यावरून गायगावाकडे जात होताय. डाबकी नाल्यावरून पाणी असतांनाही ट्रक चालकाने ट्रक पाण्यात घातल्यावर ही दुर्घटना झालीय. ट्रकमध्ये अडकलेले चालक आणि वाहक ट्रकमधून सुखरूप बाहेर निघालेत. या घटनेनंतर या पुलावरून जाऊ पाहणार्या वाहनांना पोलिसांनी थांबवलंय. ट्रक अद्यापही पाण्यात फसलेला आहेय. सकाळी पाणी कमी झाल्यावर हा ट्रक नाल्याच्या पाण्यातून काढला जाणारेय.
परभणीच्या पालम तालुक्यात एक जण गेला वाहुन
परभणीच्या पालम तालुक्यात नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहेत त्यातल्या त्यात स्थानिक लेंडी नदीत पाय घसरून पडल्याने एक जण वाहून गेलाय. पालम तालुक्यातील मौजे खोरस येथील 25 वर्षीय परमेश्वर साहेबराव खंडागळे हे शेतातून घरी येत असताना लेंडी नदीत पाय घसरून वाहून गेले आहेत शोध कार्य सुरू आहे. अंधारामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत आहे. सकाळी लवकर आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बोट द्वारे शोधण्याचा नियोजन करण्यात आले आहे.























