Rain News : मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, नांदेड- परभणीसह मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत
Maharashtra Rain Update : मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड आणिं हिंगोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर शेती पिकांचंही नुकसान झाल्याचं दिसून आलं.

मुंबई : मुंबईसह राज्यभर पावसाने दमदार हजेरी लावली असून त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. मुंबईत पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाण पाणी साचलं. मुंबईसह नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचं दिसून आलं. त्याचसोबत मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
मुंबई उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं दिसून आलं. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सबवे काही वेळेसाठी पाण्याखाली गेला. अंधेरी सबवेवर चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
परभणीत 9 गावांचा संपर्क तुटला
परभणीत गुरुवार रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पालम तालुक्यात शेतीचं नुकसान झालं. शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. तसंच पालम तालुक्यातील आरखेड, सोमेश्वर, फळा, उमरथडी,घोडा, पुयनी, आडगाव, वणभुजवाडी, तेलाजपूर या नऊ गावांचा संपर्क तुटला. पालम शहराच्या जवळून जाणाऱ्या ओढ्यालाही पूर आला. त्यामुळे आजूबाजूची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. सततच्या या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
यवतमाळमध्ये धुवाधार पाऊस
यवतमाळच्या उमरखेड आणि महागाव तालुक्यात शुक्रवार सकाळपासून विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या नाल्यांना पूर आला. पावसाचे वाढते प्रमाण पाहता शाळांना सुटी देण्यात आली. दारव्हा तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दारव्हा शहरात पाणीच पाणी असून वर्धमान, नगर, जिरापुरे कॉलनी कावेरी नगर, नातुवाडी आणि बस स्टॉप परिसरात पाणी साचलं आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झालं. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. उमरखेड शहरातील अनेक भागात दीड ते दोन फूट पाणी साचले. पावसाचा वेग असाच राहिला तर शेती पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंगोलीत जनजीवन विस्कळीत
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडला. डोंगरकडा, जवळा- पांचाळ, रेडगाव, वडगावमध्ये झालेल्या पावसाने शेकडो एकर शेतीला तळ्याचं स्वरुप आलं. रस्त्यावर पावसाचं पाणी आल्याने डोंगरकडा ते जवळा पांचाळ मार्गावरील वाहतूक बंद झाली.
बीडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने शिरूर तालुक्यातील सिंदफणा पाणी प्रकल्प ओवरफ्लो झाला. त्यामुळे सिंदफना नदी दुथडी भरून वाहत आहे. 24 तासांमध्ये बीड जिल्ह्यात 25 मिलिमीटर पाऊस झाला. यात शिरूर तालुक्यात 22.5 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. या दमदार पावसाने तालुक्यातील सिंदफणा, सिद्धेश्वर आणि बेलपारा हे पाणी प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. यामुळे शिरूरकरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय.
नांदेड जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडाली
नांदेडमध्ये गुरुवारी संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. शहरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे सर्वच रस्ते जलमय झाले असून रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. वसंत नगर, दत्तनगर, श्रावस्ती नगर, आनंद नगर या भागात पावसाचं पाणी शिरलंय. पावसामुळे नांदेड शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय.























