कोरोनात विस्कटलेली गावाची घडी मुंबईकरांनी सावरली, शिक्षकदिनी उभारलं नवं वाचनालय!
भुदरगड खोऱ्यातील पिंपळगांव याठिकाणी गावातील तरुणांच्या सहकार्यातून मुंबईकर मित्रांनी गावचे रुपडं बदलण्याचा ध्यास घेतला. भुदरगड प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने कामाला सुरुवात केली.
कोल्हापूर : कोरोना व्हायरसच्या संकटात पुणे - मुंबईवरून येणाऱ्या नागरिकांमुळे गावातील वातावरण काहीसं काळजी करणाऱ्यासारखं बनलं होतं. कारण मुंबई आणि पुण्यात कोरोनाचं संकट अधिक वाढलं होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसात शहरी विरुद्ध ग्रामस्थ असा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र आता गावातील वातावरण बदललं आहे.
भुदरगड खोऱ्यातील पिंपळगांव याठिकाणी गावातील तरुणांच्या सहकार्यातून मुंबईकर मित्रांनी गावचे रुपडं बदलण्याचा ध्यास घेतला. भुदरगड प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने कामाला सुरुवात केली. पिंपळगावात महाराणी ताराराणी वाचनालय सुरु करण्यात आलं आहे. बघता बघता हजारो पुस्तकं जमा झाली. यामुळे मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसणाऱ्या तरुणांना या वाचनालयाचा फायदा होणार आहे.
शिक्षक दिनी शेकडो पुस्तकं भेट!
आज शिक्षक दिन असल्याने कोरोनामुळे अद्याप गावी राहिलेल्या तरुणांची शाळेतील गुरुजीं सोबत भेट होत आहे. पिंपळगाव या ठिकाणी नव्याने उभारलेल्या वाचनालयाला आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने शेकडो पुस्तकांची भेट मिळत आहे. स्थानिक तरुण आणि मुंबईकर यांच्या या मदतीने उभा राहिलेला हा खजिना येणाऱ्या पिढीला नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात शहरातून लाखो नागरिक दाखल झाले. यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. आता याच तरुणांनी गावात वाचनालय उभारणे, शाळा दुरुस्त करणे, गावाच्या विकासासाठी निधी उभा करणे, असे अनेक उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या योध्यांच्या मागे ठामपणे उभा राहण्याचं काम ही मुंबईकर मंडळी उभा राहत आहेत. गावागावात फेस शिल्ड आणि अर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या वाटण्याचं काम हे तरुण करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :