अपघातग्रस्तासाठी बच्चू कडू बनले 'देवदूत', अपघातग्रस्त व्यक्तीला स्वत:च्या शासकीय वाहनातून नेले रूग्णालयात
राज्यमंत्री बच्चू यांच्यामुळे आज एका अपघातग्रस्ताला अगदी वेळेवर उपचार मिळालेत. एव्हढंच नाही तर त्या अपघातग्रस्ताला बच्चू कडू यांनी स्वत:च्या शासकीय वाहनातून रूग्णालयात दाखल केलं.
अकोला : बच्चू कडू... सध्या राज्याचे शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार अशा अनेक खात्यांचे राज्यमंत्री. मात्र, बच्चू कडू यांची याआधी एक ओळख आहे, ही ओळख आहे 'आंदोलक नेता', 'फायरब्रँड लोकप्रतिनिधी' आणि 'संवेदनशील माणूस' अशी. आज राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील याच संवेदनशील माणसाचं परत एकदा दर्शन झालं आहे. राज्यमंत्री बच्चू यांच्यामुळे आज एका अपघातग्रस्ताला अगदी वेळेवर उपचार मिळालेत. एव्हढंच नाही तर त्या अपघातग्रस्ताला बच्चू कडू यांनी स्वत:च्या शासकीय वाहनातून रूग्णालयात दाखल केलं.
अकोल्याच्या दौऱ्यावर जात असतानाची घटना
बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आज राज्यमंत्री बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा या आपल्या गावावरून अकोला जिल्ह्यातील कट्यार गावाकडे निघाले होते. त्यांचा ताफा दर्यापूरजवळ येत असताना दुचाकीवरील एक युवक अपघात झाल्यामुळे रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. राज्यमंत्री कडूंनी तात्काळ आपला ताफा थांबवत त्या तरूणाला आपल्या गाडीत टाकण्याचे आदेश दिले. त्या तरूणाला गाडीत टाकत बच्चू कडू यांचा ताफा वेगाने दर्यापूरच्या तालुका रूग्णालयाकडे निघाला. रूग्णालयात पोहोचण्याआधीच आरोग्य यंत्रणेला सुचना देत परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आणून दिलं. दर्यापूरला आणताच सरकारी दवाखान्यात त्या अपघातग्रस्तावर उपचार सुरू झालेत. त्यानंतर रूग्ण सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच बच्चू कडू पुढील दौऱ्यासाठी अकोला जिल्ह्यातील कट्यारकडे रवाना झालेत.
अपघातग्रस्ताच्या कुटुबियांकडून बच्चू कडूंचे आभार
अपघात झालेल्या तरूणाचे नाव राजेश पंजाबराव गावंडे असं आहे. तो दर्यापूर तालूक्यातील धानोडी गावाचा रहिवासी आहे. आपल्या मुलाला बच्चू कडू यांंनी वेेेेळेेेवर रूग्णालयात पोहोचविल्याने तो सुखरूप असल्याची भावना राजेश गावंडे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडूंचे मन:पूर्वक आभार मानलेत. राज्यमंत्री बच्चू कडूंच्या या संवेदनशीलपणाचं लोकांमधूनही मोठं कौतूक होत आहे.
रक्तदान आणि रूग्णसेवेसाठी ओळखले जातात बच्चू कडू
बच्चू कडू विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातून 2019 मध्ये चौथ्यांदा विधानसभेवर विजयी झाले आहेत. 1999 मध्ये अपक्ष म्हणून अचलपूरमधून अत्यल्प मतांनी पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुढच्या चार निवडणुकांमध्ये तब्बल चारदा दणदणीत विजय प्राप्त केला आहे. त्याआधी त्यांनी रक्तदान शिबीरं आणि रूग्णसेवेतून संपूर्ण जिल्हाभरात ओळख निर्माण केली. अनेक दुर्धर आजारांनी ग्रस्त गरीब रूग्णांवर मुंबईत मोफत उपचार करवून घेतलेत. त्यामूळे बच्चू कडूंच्या राजकारणाचा पाया याच दोन गोष्टींतून घातला गेला. मंत्रिपदाचं ग्लॅमर आल्यानंतरही त्यांच्यातील रूग्ण सेवक तसाच असल्याचा प्रत्यय आजच्या प्रसंगातून आल्याचं आज जनतेला पहायला मिळालं आहे.