(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yavatmal : वाघीण शिकार प्रकरणात वनविभागाच्या पथकाकडून महिलांना मारहाण झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप
वाघीण शिकार प्रकरणात वनविभागाच्या पथकाकडून निष्पाप लोकांना गोवल्याचा आणि महिलांना मारहाण केल्याचा आरोप वरपोड गावकऱ्यांनी केला आहे.
यवतमाळ : वरपोड येथे आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकाकडून महिलांना मारहाण झाल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे. तसेच वाघिणीच्या शिकार प्रकरणात गावकऱ्यांना नाहक गोवल्याचा आरोपही वनविभागावर करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मुकूटबन वनपरिक्षेत्रात 25 एप्रिल 2021 रोजी एका गुहेच्या तोंडाशी क्रूरपणे एका 2 महिन्याच्या गर्भवती वाघिणीला जाळून मारल्याची घटना घडली होती. या वाघीण शिकार प्रकरणात वनविभागाने शनिवारी पहाटे पाच आरोपींना झरी तालुक्यातील वरपोड येथून अटक केली होती.
आरोपींना पकडण्यासाठी गावात आलेल्या वनविभागाच्या पथकाने आरोपींच्या घरातील महिलांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करीत गावकरी आज मुकूटबन पोलीस ठाण्यासह वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडकले आणि तिथं त्यांनी पोलीस निरीक्षक यांना त्यांच्या मागणीचे निवेदन दिले.
शनिवारी पोलीस आणि वन विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत वरपोड येथील पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींना अटक करतांना संयुक्त पथकात मोठा प्रमाणात वन अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अधिकारी सहभागी होते.
अगदी पहाटे 5 वाजता ही आरोपींना अटक करण्याची कारवाई करण्यात आली होती. पुराव्याशिवाय या पथकातील अधिकाऱ्यांनी आरोपींच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या कुटुंबियातील महिलांना बेदम मारहाण करून दहशत पसरविली, तसेच या वाघीण हत्या प्रकरणात पाच व्यक्तींना विनाकारण अटक केली असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यावेळी काही महिलांना पथकातील जवानांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली असाही आरोप या वरपोड गावातील महिलांनी केला आहे .
वरपोड गावातील निष्पाप व्यक्तींना या प्रकरणात नाहक गोवण्यात आल्याचा आरोप या निवेदनामध्ये करण्यात आला आहे. वाघिणीची हत्या इतकी निर्घृण होती की हत्या करणाऱ्यांनी गुहे समोर आग लावली व वाघिणीचे दोन्ही पंजे तोडून नेले होते.
महत्वाच्या बातम्या :
- यवतमाळमधील गर्भवती वाघीण हत्याप्रकरणी 5 जणांना बेड्या, आरोपींच्या अटकेवेळी वनविभागाचा मोठा फौजफाटा
- 14 Years of ABP Majha : 14 वर्षे विश्वासाची... गेल्या 14 वर्षांपासून अमर्याद महाराष्ट्राचा आवाज 'एबीपी माझा'
- शरद पवारांच्या दिल्लीतील निवसस्थानी आज संध्याकाळी 15 नेत्यांची बैठक; तिसऱ्या आघाडीची चाचपणी?