(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Environment Day : तारु देवाच्या नावाने ताडोबा जंगल, तारु आणि वाघामध्ये तुंबळ युद्ध... आता वाघाला मानतात कुलदैवत
Tadoba-Andhari Tiger Reserve : तारुचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्याच ठिकाणी एक मंदिर बांधण्यात आलं. आज त्या जंगलाला नाव ताडोबा असं आहे.
Tadoba-Andhari Tiger Reserve : चंद्रपूर : आज जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) साजरा केला जात असताना त्यामध्ये जंगलांचे सर्वात जास्त महत्व आहे. जंगलं ही पृथ्वीसाठी फुफ्फुसं असल्यासारखी आहेत. म्हणून जंगलांचं संवर्धन (Conservation of Forests) करणं अत्यावश्यक आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (Tadoba) असंच एक जंगल. या जंगलाबद्दल कुणाला माहिती नाही अशी माणसं दुर्मिळच. पण या जंगलाला ताडोबा हे नाव कसं पडलं याबद्दल मात्र बहुतांश लोकांना काही कल्पना नाही. ताडोबा नावामागे तशीच एक रंजक कथा आहे.
चंद्रपूर आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) सीमेवर वसलेलं हे जंगल सर्वात महत्त्वाच्या जंगलांपैकी एक. राज्यातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी आहे. प्राचिन काळात या परिसरावर गोंड आदिवासी लोक रहायची, गोंड राजाची या ठिकाणी सत्ता होती.
तारू आणि वाघामध्ये तुंबळ युद्ध
तारु नावाचा एक गोंड आदिवासी तरुण, तिथल्या गावचा प्रमुख होता. गावच्या तलावाजवळ त्याची एका बलाढ्य वाघासोबत लढाई झाली. वाघ जरी बलाढ्य असला तरी तारूदेखील तितकाच पराक्रमी होता. तारूने आपल्या गावाच्या संरक्षणासाठी त्या वाघाचा सामना केला. काही जण सांगतात की त्यामध्ये तारुचा विजय झाला. तारुचा जरी विजय झाला असला तरी तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मग त्याच्या सन्मानार्थ त्या तलावाजवळ एक मंदिर बांधलं गेलं. त्याच्या नावावरुनच नंतर या जंगलाचे नाव तारू झालं. याला तारूबा असंही म्हटलं जायचं.
दुसरी अख्यायिका...
ताडोबाच्या नावामागे आणखी एक अख्यायिका असल्याचं सांगितलं जातंय. या जंगलात एक लग्नाची वरात चालली होती. वरातीतील लोकांना तहान लागल्याने त्यांनी त्या ठिकाणी खोदायला सुरू केलं. थोडं खोदल्यानंतर प्रचंड प्रमाणात पाणी लागलं. त्या पाण्याचा फ्लो एवढा वाढला की ते वराती त्यामधून वाहून गेले. मग ज्याचं लग्न होतं त्या नवरदेवाच्या नावाने म्हणजे तारूच्या नावाने या तलावाच्या काठी एक मंदिर बांधण्यात आलं. नंतर या जंगलाला ताडोबा हे नाव पडलं.
या सर्व परिसरावर गोंड राजाची सत्ता होती, पण नंतर ब्रिटीशांनी हे जंगल ताब्यात घेतलं. मग ब्रिटीशांनी त्या नावाच्या अपभ्रंश केला आणि त्याचं नाव ताडोबा असं झालं.
ब्रिटिशांना या ठिकाणचे लाकूड हवं होतं त्यासाठी त्यांनी 1879 साली हे जंगल राखीव वन म्हणून घोषित केलं. त्यानंतर 1935 साली या ठिकाणी शिकारीला बंदी घालण्यात आली. 1955 साली हे जंगल संरक्षीत वन असल्याचं जाहीर करण्यात आलं, त्याचं रुपांतर राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलं.
वाघाला कुलदैवत माणतात
आपल्या संस्कृतील पशू-प्राण्यांना मोठं महत्व आहे, अगदी हडप्पाकाळापासून त्यांची पूजा केली जाते. ताडोबा जंगलामधील आदिवासी लोक वाघाला देव मानतात. काही जमातीमध्ये अस्वलं, हरिण आणि इतर प्राण्यांनाही देव माणलं जातं.
ताडोबा जंगलाचे असिस्टंट कन्झर्व्हेटिव्ह ऑफ फॉरेस्ट (ACF) असलेले महेश खोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, एखाद्या वाघाने माणसाला मारले तरी ताडोबातील लोक त्या वाघाला मारत नाहीत, बदला घेत नाहीत. वाघाने आपल्यावर अवकृपा केल्याने आपला माणूस गेला असा समज आहे. मग वाघ कोपू नये म्हणून ते वाघाला देव माणतात आणि त्याची पूजा करतात. वाघांना त्यांच्यापासून कोणताही धोका नसल्याने त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
ताडोबात अनेक आदिवासींच्या जमाती राहतात. पण त्यांनी केवळ जगण्यासाठी या जंगलाचा वापर केला आहे. त्यांनी कधीही व्यावसायिक वापर केला नाही, त्यामुळे जंगलं टिकून राहिली, वाघ टिकून राहिले असंही महेश खोरे म्हणाले.
ताडोबा देवाच्या यात्रेवर बंदी
या ठिकाणी दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दरम्यान ताडोबा देवाची एक मोठी यात्रा भरायची. आजूबाजूच्या परिसरातून लाखो आदिवासी या ठिकाणी यायचे आणि त्याची पूजा करायचे. त्या ठिकाणी बकरे आणि कोंबड्यांचा बळी द्यायचं, जेवण, बाकी सर्व गोष्टी व्हायच्या. पण त्यांच्या या कृतीमुळे या परिसरात त्या ठिकाणी घाण, प्लॅस्टिक साचायला लागलं. प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे हरणांसारख्या प्राण्यांचा जीव जायला लागला, इतर सर्वच प्राण्याचा जीव धोक्यात आला. त्या ठिकाणच्या वनस्पती धोक्यात आल्या.
मग यावर उपाय म्हणून वन खात्याने 2002 पासून हळूहळू या ठिकाणच्या यात्रेवर बंदी आणायला सुरूवात केली. आता या ठिकाणी, म्हणजे ताडोबा देवाच्या ठिकाणी जायला कुणालाही परवानगी नाही अशी माहिती महेश खोरे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत येणाऱ्या ताडोबा जंगलाचा परिसर हा जवळपास 1,72,500 हेक्टर इतका आहे. हा परिसर अत्यंत घनदाट असा आहे. या जंगलात वाघांची संख्या आता 85 इतकी आहे. ताडोबाचे जंगल हे वाघांसाठी सर्वोत्तम प्रजनन केंद्र म्हणून ओळखलं जातं. तसेच अस्वलं, हरणे, आणि इतर अनेक प्राण्यांचे या ठिकाणी वास्तव्य आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये अंधारी ही नदी वाहते. चिमुरच्या डोंगरातून उगम पावणारी ही नदी ताडोबाची जीवनवाहिनी आहे. ताडोबा जंगल हे मगर आणि सुसरींसाठी प्रसिद्ध आह. सुसरींचे प्रजनन केंद्र या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे.
तर अशा या ताडोबाची सफर तुम्ही एकदा कराच, त्या ठिकाणच्या डोळ्याचं पारणं फिटावं अशा घनदाट जंगलाला भरभरून पाहा.
महत्त्वाच्या बातम्या :
- World Environment Day : जागतिक पर्यावरण दिवस भारतासाठी का महत्त्वाचा आहे? जाणून घ्या भारतातील प्रदूषणाची स्थिती आणि परिणाम
- Environment Day Special : लिव्हिंग रुट ब्रिज; मेघालयातील निसर्गाचा अद्भूत आविष्कार
- Environment Day Special : मानव वन्यजीव सह-अस्तित्वाचं आदर्श उदाहरण, बिलिगिरी रंगास्वामी व्याघ्र प्रकल्प