एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट : 'गडकरी वाडा' भाजपसाठी इतका महत्त्वाचा का?
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सर्व राजकीय हालचालींचे केंद्रबिंदू ठरले आहे गडकरी वाडा! नितीन गडकरी यांचे राहते घर. महत्वाचे म्हणजे गडकरी वाड्यावर गेले दोन दिवस जे काही होते आहे, त्याचे परिणाम फक्त भाजपावर होत नाही, तर इतर राजकीय पक्षांवर सुद्धा होत आहे हे महत्वाचे.
नागपूर महापालिकेत भाजपचे केवळ 63 नगरसेवक आहेत. मग एवढी अडचण का यादी फायनल करायला? खरंतर हाच प्रश्नही आहे आणि हेच उत्तर!
कालपासून गडकरी वाड्यावर मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. पहिल्यांदा मुख्यमंत्री आले, मात्र गडकरी गावात नसल्याने मुख्यमंत्री बैठकीसाठी रात्रभर नागपुरातच राहिले. अखेर मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्यात बंद खोलीत बैठक झाली. बाहेर सर्व आमदार, शहर पदाधिकारी थांबले होते. पण यादी काही फायनल झाली नाही. नंतर आमदार, पदाधिकारी हेही बैठकीत सामील झाले. पण यादी काही फायनल झाली नाही. बाहेर लोकांची, इच्छुकांची गर्दी वाढतच गेली. जवळ जवळ तीन तास वाड्यावर थांबल्यावर मुख्यमंत्री गेले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी गडकरींबरोबर फायनल केली होती. इतर अनेक जागा फायनल केल्या. पण यादी फायनल केली नाही. कारण काही किचकट निर्णय बाकी होते आणि ते निर्णय मुख्यमंत्री गेले तरीही वाड्यावर मात्र सुरूच होते. लोकांची गर्दी काही ओसरायचे नाव घेत नव्हती.
इच्छुकांच्या गर्दीत विद्यमान नगरसेवकही होते. फॉर्म भरण्यासाठी अवघे 24 तसाच उरले होते. लोकांची गर्दी वाढत जात होती आणि तेवढ्यात कळले की आता बैठक संपली. परत नव्याने बैठक होणार. रात्रीपर्यंत यादी येत नव्हती. त्यामुळे फक्त तर्क-वितर्क सुरु होते. ज्या काही मंडळींना काळत होते, ते शांत होते. कारण फॉर्म ऑनलाईन भरायचा होता. बंडखोरी नको म्हणून तेही गप्प.
अखेर रात्रीची बैठक सुरु झाली यात सर्व पदाधिकारी होते . परत एक मॅरेथॉन बैठक झाली. रात्री दीड वाजेपर्यंत चालली. पण तरीही यादी फायनल झाली नाही. मात्र, ह्या बैठकीतून चित्र थोडं स्पष्ट व्हायला लागलं होतं. लोकांची गर्दी ही इथे मात्र तशीच. परत एक बैठक सकाळी ठरली. गडकरींनी आपले दिल्लीला जाणे पण पुढे ढकलले.
'जहाँ दम वहा हम' हे राजकारणात जितके खरे आहे तितके दुसरीकडे नाही आणि त्यामुळेच काही वर्षांपासून नागपूर म्हटले कि भाजपा असे झाले होते. ज्यांना थोडी बहोत ही राजकीय स्वप्न रंगवायची होती, ती सर्व मंडळी भाजप गाठत होती. त्यामुळे चक्क 151 जागांसाठी 300 च्या वरती उमेदवारी अर्ज आले आणि भाजपाची पंचाईत झाली. 70 % विद्यमान नगरसेवक बदलायचा निर्णय करावा लागला. त्यामुळे बंडखोरी होणार हे पक्के झाले. नाराजीचा सामना करावा लागणार हेही पक्के झाले. काही मोठी नावे गाळावी लागणार हेही नक्की झाले. मग हे पाऊल हळूच टाकावं लागणार होतं. त्यात गडकरी आणि मुख्यमंत्री या दोघांचं होमग्राऊंड म्हणजे नागपूर. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेवर सत्ता गाजवण्यासाठी नगरसेवक नक्की कोणाचे असावेत, यात सत्तेची मूठ किती पक्की, हे दडले आहे.
या बैठकीच्या दरम्यान आठवले गटाला सांगण्यात आले की, तुमच्या काही उमेदवारांना ते कमळावर लढले तर उमेदवारी देऊ, युती नको. काल रात्री असेही निर्णय यादी फायनल करताना घ्यावे लागले.
सुलेखा कुंभारेंसह इतर काही रिपब्लिकन नेते मंडळीही भेटीला आली. युती कशी करावी हीच चर्चा. पण इतर वेळी या सर्वांशी अत्यंत जवळचे संबंध असलेल्या गडकरींना यादी बनवताना तुमची नावे घेऊ पण कमळावर लढा असे सांगावे लागले. एवढेच नाही तर यादी लांबण्याची कारण म्हणजे काही इनकमिंग अगदी शेवटपर्यंत सुरु होते. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या प्रगती पाटील आणि त्यांचे पती जे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राहिले आहे, त्यांचे स्वागत झाले. प्रगती पाटील यांना आता यादीत जागा मिळणार हे पक्के झाले.
लोक थांबलेले, रात्री दीड वाजले. पण तरीही यादी फायनल झाली नाही आणि सकाळी बैठक सुरु झाली. चित्र बरेच स्पष्ट झाले आणि नाराजी सुरु झाली. गडकरी वाड्यावर सलामी द्यायला जसे लोक येतात, तसे निदर्शने सुरु झाली. बजरंग दलाचे श्रीकांत आगलावे असो, शाळा समितीचे सभापती राहिलेले गोपक बोहरे असो किंवा चेतना टांकचा विरोध करणारे असो. समर्थक, विरोधक सगळे वाड्याबाहेरच आपले प्रदर्शन करत होते. हा गोंधळ भाजपा ऑफिस समोर न होता, वाड्याबाहेर होणे हे सुद्धा राजकीय स्टेटमेंट आहे. हा सर्व गोंधळ पाहता शिवसेना आणि मनसेसारखे पक्ष आपली यादी घोषित करायला थांबले होते. या सर्वाला गडकरी यांनी तारेवरची कसरत म्हटले आहे.
गडकरी वाडा.... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. एकेकाळी विदर्भ म्हटलं की काँग्रेस हे चित्र बदलवणारे अनेक निर्णय ह्या वाड्यातूनच झाले आणि आजही शेवटी जी मंडळी फायनल झाली, त्यांना फॉर्म भर हे सांगणारे फोन हे सुद्धा याच वाड्यावरून आले. त्यामुळे वाड्याची ताकद हे नागपूरचे राजकीय सत्य आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement