Weather Update : अवकाळी पावसामुळे गारठा वाढला! आजही पावसाची शक्यता कायम; IMD चा अंदाज काय सांगतो?
IMD Rain Forecast : आजही देशात अनेक भागात पावसाची शक्यता कायम आहे. अवकाळी पावसामुळे तापमानात मात्र, घट झाली आहे. पावसामुळे हवेत गारठा वाढला आहे.
Unseasonal Rain Alert : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह देशातील अनेक भागांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह विजांचा गडगडाट पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. आजही देशात अनेक भागात पावसाची शक्यता कायम आहे. अवकाळी पावसामुळे तापमानात मात्र, घट झाली आहे. पावसामुळे हवेत गारठा वाढला आहे. डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने त्याचाही हवामानावर परिणाम होत असून पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यावर आजही अवकाळी पावसाचं सावट
महाराष्ट्रात अनेक भागात वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आजही मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसामुळे थंडीत वाढ झाली असून काही भागात धुक्याची चादर परसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, परभणी, बीड, हिंगोलीसह पुण्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) गारपिटीने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यातील विविध भागात पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. गहू, बाजरी, लिंबू आणइ टरबूज पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
'या' भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता
भारतीय हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, आज अरुणाचल प्रदेशात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टी किंवा हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातही पावसासोबत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
दक्षिण भारतात तापमान वाढ
एकीकडे उत्तरेकडे तापमानात घट होत असताना, दक्षिण भारतात मात्र, तापमान वाढत आहे. तापमान वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याच अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तापमान वाढणार असून पारा घसरण्याची शक्यता नाही. त्यामुळे उष्णतेची लाट येण्यासारखी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :