'आम्ही आधीपासून हिंदूच, देवदर्शन सांगून पैठणला नेलं होतं,' जालन्यातील कथित धर्मांतर करणाऱ्या कुटुंबाकडून गौप्यस्फोट
पैठणमध्ये 25 डिसेंबरला जालना जिल्ह्यातील 53 जणांनी ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केल्याची चर्चा झाली होती, पण आता या साऱ्यामागील एक नवं सत्य समोर आलं आहे.
औरंगाबाद : पैठण येथून समोर आलेल्या 53 जणांच्या ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश करण्याच्या बातमीला एक नव वळण मिळालं आहे. या सर्व धर्मांतर प्रकरणामागील नेमकं सत्य आता समोर येऊ लागलं आहे. 25 डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातील 53 जणांनी पैठण येथे ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केल्याची बातमी समोर आली होती. सर्वत्र याबाबत चर्चा होत होती. यावर पैठण येथील नाथ वंशजांनी या 53 जणांचे शुद्धीकरण करून हिंदू धर्मांत प्रवेश केल्याचा दावा देखील केला होता. मात्र ख्रिश्चन संघटनांनी हे खोट असल्याची तक्रार केली ज्यामुळे या मागचे नेमके सत्य जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने त्या 53 जणांपैकी 8 सदस्य असलेल्या एका कुटुंबाला शोधत याबाबतचा तपास केला. त्यानंतर या सर्व कथित धर्मांतराची दुसरी बाजू समोर आली आहे.
ज्यानुसार ज्यांच्या धर्मांतराचा दावा करण्यात आला त्या मंडळींनी मात्र आपण पूर्वीपासून हिंदूच आहोत आणि आमचे कोणतेही धर्मांतर झालेले नाही, असे स्पष्ट केले आहे. शिवाय आम्हाला देवाला घेऊन जायचे म्हणून सांगण्यात येऊन पैठणला घेऊन गेल्याबाबत ही कुटुंबाने सांगितलं आहे. ज्यानंतर जालन्यातील ख्रिश्चन समाजाच्या नेत्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कथित धर्मांतर प्रकरणात आतापर्यंत काय काय झालं?
सर्वात अगोदर 25 डिसेंबर या तारखेला पैठण मध्ये जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील 53 जनांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्माचा स्वीकार केल्याची माहिती समोर आली.
26 डिसेंबरला ही बातमी समोर आली ज्यानंतर माध्यमांनी ही बातमी दाखवली.
27 डिसेंबरला एबीपी माझाने पैठणला जाऊन या धर्मांतराची माहिती घेतली. तेंव्हा तेथील संत एकनाथांचे वंशज रावसाहेब महाराज यांनी याला दुजोरा देत नागरिकांचे गंगा स्नान करून शुद्धीकरण करून हिंदूधर्म प्रवेश केल्याचे सांगितले.
27 डिसेंबरला बीड येथील अल्फा ओमेगा ख्रिश्चन संघटनेने मात्र धर्मांतराचा हा दावा खोडून काढत धर्मांतरित झालेली लोक ख्रिश्चन नसल्याचा दावा केला तसेच ख्रिश्चन समाजाला बदनाम करून जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील केला.
27 तारखेलाच एबीपी माझाच्या बातमीनंतर पैठणच्या ब्राह्मण महासंघाचे तेथील अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी धर्मांतर झाले नसून त्यांनी दोन महिन्यापूर्वीच हिंदू धर्मात प्रवेश केला म्हणजेच त्यांनी घरवापसी केली म्हणून आम्ही त्यांचे केवळ स्वागत केल्याचा दावा केला. दरम्यान खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने जालना जिल्ह्यातील मंठा तालुका गाठला. जिथे आम्हाला कुठलेही चर्च अथवा ख्रिश्चन वस्ती आढळली नाही. दरम्यान मंठा तालुक्यातल्या देवगाव येथे धर्मांतराच्या फोटोमधील दोघा जणांची आम्हाला त्या ठिकाणी ओळख पटली मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही.
28 डिसेंबरला एबीपी माझाने अखेर या 53 पैकी आठ जणांच्या एका कुटुंबाला शोधण्यात यश मिळवलं. त्या कुटुंबीयांनी आपण कधीही ख्रिश्चन नव्हतो आपण जन्मापासून हिंदू असून आताही हिंदु असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता धर्मांतराची बातमी का उठवण्यात आली? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा :
- जास्तीचे भाडे उकळणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करणार, कल्याण डोंबिवली आरटीओचा इशारा
- Kalyan: नवजात बाळाला रेल्वेत सोडून मातेचे प्रियकारासह पलायन, पोलीस चौकशीतून धक्कादायक कारण समोर
- KDMC: कल्याण डोंबिवलीतील लाखो मतदारांचे यादीत फोटोच नाही, दिड लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha