मराठी साहित्य संमेलन | एका हातात धर्मग्रंथ तर दुसऱ्या हातात संविधान हवं : फादर दिब्रिटो
प्रत्येक व्यक्तीच्या एका हातात त्याचा धर्मग्रंथ आणि त्याच्या दुसऱ्या हातात देशाचं संविधान असायला हवे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले आहे.
उस्मानाबाद : प्रत्येक व्यक्तीच्या एका हातात त्याचा धर्मग्रंथ आणि त्याच्या दुसऱ्या हातात देशाचं संविधान असायला हवे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले आहे. 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरु आहे. फादर दिब्रिटो हे त्याचे अध्यक्ष आहेत. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सध्याच्या विविधी मुद्द्यांवर भाष्य केले.
दिब्रिटो म्हणाले की, मी प्रभू येशूचा उपासक आहे, प्रभू म्हणतात की, त्यांना माफ कर त्यांना माहीत नाही ते काय करत आहेत. मी संताना मानणारा आहे. जो मराठी आहे त्याला संतांची गोडी लागलीच पाहिजे. मी संतांना विसरू शकत नाही, विशेषतः मी माझ्या लाडक्या तुकोबाला विसरु शकत नाही.
दिब्रिटो म्हणाले की, सध्या देशात जे सुरु आहे, त्यावर आपण भूमिका घ्यायला हवी. मी ती भूमिका घेतोच. मी स्पष्ट बोलतो, आणीबाणीच्या काळातही मी उपरोधिक पत्र लिहीत होतो. प्रत्येक माणसाने नैतिक भूमिका घ्यायला पाहिजे.
सध्या देशात सुरु असलेल्या गोष्टींकडे पाहिलं की प्रश्न पडतो की,आपण भुतांच्या प्रदेशात राहतो की माणसांच्या? लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना मारहाण करत असाल, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा दिब्रिटो यांनी यावेळी दिला.
उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाची शुक्रवार 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी गुलाबी थंडीत ग्रंथदिंडीद्वारे मोठया उत्साहात सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उस्मानाबाद येथे प्रसिद्ध कवी पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या हस्ते करण्यात आले. तर ग्रंथदिंडीचा शुभारंभ साहित्य महामंडळाचे कौतिकराव ठाले-पाटील, जिल्हा परिषदचे सीईओ संजय कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी सकाळी 10 वाजता श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलामधून ग्रंथदिंडी व शोभा यात्रेस मोठया जल्लोषात प्रारंभ झाला. विविध वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले विद्यार्थी, सामाजिक संदेश देणारे देखावे, टाळ - मृदुंगाचा गजर, विद्यार्थ्यांसोबतच तरुण, नागरिक, देशभक्तिपर देखाव्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात आले.
साहित्य-रसिकांची जिंकली मने ग्रंथदिंडी व शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात विविध देखावे, छत्रपती शिवाजी महाराज, संत गोरोबाकाका, संत गाडगेबाबा, बाल वारकरी, महिलांचे ढोल पथक, लेझीम पथक, मुलींचे बॅण्डपथक आदी मोठया संख्येने सहभागी होते. पूर्ण शहरात या शोभायात्रेमुळे उत्साहाला उधान आले हेाते. प्रस्तुत करण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी साहित्य-रसिकांची मने जिंकली. जवळपास तीन किलोमीटरचे अंतर पूर्ण करून ग्रंथदिंडीचे संमेलनास्थळी आगमन झाले.