पालघरची वारली चित्रशैली झळकणार प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात, जिल्ह्यातील 20 चित्रकारांचा सहभाग
पालघरची वारली चित्रशैली प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात झळकणार आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील 17 आणि विक्रमगडच्या 3 चित्रकारांचा यामध्ये सहभाग आहे.
पालघल : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात आदिवासी संस्कृतीचा इतिहास 6 बाय 45 फुटांच्या चित्रातून दिसणार आहे. देशभरातील 250 आदिवासी चित्रकारांनी ते साकारले असून पालघर जिल्ह्यातील वीस वारली चित्रकारांचाही त्यामध्ये सहभाग आहे. अमृत मोहोत्सवाच्या या कार्यक्रमातून जगाच्या कानाकोपऱ्यात आदिवासी संस्कृती पोहोचणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवानिमित्त भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनी संचलनात आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या चित्राचा समावेश करण्यात आला आहे. 6 बाय 45 फुटाच्या या चित्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंतच्या आदिवासी संस्कृतीतील घटना आहेत. पाच चित्रांची ही मालिका असून त्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी देशभरात आदिवासींवर होणारा छळ, अन्याय आणि त्याविरुद्ध अदिवासींनी दिलेला लढा, स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासाठी संघटना तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समुहाने एकत्र राहून शेती व शेतीपूरक व्यवसाय करत असल्याचे चित्रात साकारले आहे. निसर्ग व गावदेवाचे पूजन करून स्वातंत्र्य भारतात गुण्यागोविंदाने जीवन जगत असल्याचे विविध घटना प्रसंगही आहेत.
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडन आर्ट न्यू दिल्लीकडून पंजाब येथील चितकारा युनिव्हर्सिटीत 24 ते 31 डिसेंबर या कालावधीत वर्कशॉप घेतण्यात आले. यात देशभरातील 250 चित्रकारांचा सहभाग होता. यामध्ये पालघर जिल्ह्यातील वीस कलाकार होते. डहाणूच्या गंजाड गावचे जगप्रसिद्ध वारली चित्रकार पद्मश्री कै. जिव्या सोमा म्हसे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या शिष्यांसह इतर सतरा जण या चित्रशैलीत सहभागी आहेत तर विक्रमगड तालुक्यातील तीन जणांचा सहभाग आहे.
महत्वाच्या बातम्या
- Kirti Shiledar passes away : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचं निधन
- गोव्यासाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर, आदित्य ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरणार : संजय राऊत
- BJP Candidates List : गोव्यासाठी भाजपची 34 उमेदवारांची यादी, उत्पल पर्रिकरांना पणजीतून उमेदवारी नाकारली
- सध्या गोव्याची सत्ता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या हातात : संजय राऊत