दिलासादायक! यवतमाळमध्ये विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा सुरु; प्लाझ्मा थेरपीसाठीही ICMRची परवानगी
यवतमाळमध्ये विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा सुरु झाली असून त्यासाठी ICMRने परवानगी दिली आहे. तसेच लवकरच कोरोना बाधितांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी प्रक्रियाही सुरु करण्यात येणार आहे.
यवतमाळ : जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता लवकरच कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना देऊन उपचार केले जाणार आहेत. यासंदर्भात विषयावर वैद्यकीय महाविद्यालयासोबत इथिकल कमिटीची मिटिंग झाली असून याच्या परवानगीसाठी पत्र आयसीएमआर (ICMR) दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर आणि प्रधान सचिव यांच्या परवानगीनंतर ही प्लाझ्मा थेरपी प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचं यवतमाळ जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी सांगितले आहे. त्यासाठी 50 ते 60 लाख रुपये लागतील ते जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून करणार आहोत असेही जिल्हाधिकारी सिंग यांनी सांगितले.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना देण्यात येईल. म्हणजेच, जी व्यक्ती पूर्णपणे कोरोनातून बरी होणार आहे. त्या व्यक्तीचा प्लाझ्मा नवीन रुग्णाला देण्यात येणार आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला कुठल्याही दुसरा आजार नाही, हे सुद्धा तपासले जाणार असल्याचं वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता राजेश सिंग यांनी सांगितले आहे .
पाहा व्हिडीओ : ससून रुग्णालयात एका रुग्णावरील प्लाझ्मा थेरपी यशस्वी,प्लाझ्मा थेरपीचा कसा वापर होतो?
कोरोना विषाणुच्या संसर्गाने संपूर्ण मानवजातीला संकटात टाकले आहे. यावर उपचार करण्यासाठी तसेच लस शोधण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. त्यात आता यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येणाऱ्या कोरोनाच्या नवीन रुग्णांचे तपासणीसाठीचे नमुने तपासणीकरीता नागपुरवर अवलंबून राहावे लागत होते. आता मात्र कोरोना रुणांची टेस्ट यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयामध्येच होणार आहे.
तपासणीच्या अत्याधुनिक मशीन यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाल्यामुळे कोरोनासह सर्व साथरोगांचे निदान आता यवतमाळमध्येच होणार आहेत. महाविद्यालयात विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) ची सुरुवात झाली आहे. आता 24 तासांत 150 ते 250 रुग्णांची कोरोना तपासणी करणं शक्य होणार आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग लवकर कळण्यास मदत होईल. तसेच रुग्णांवर त्वरित उपचार करणंही सोपं होईल.
पूर्वी कोरोनाबाधित असलेल्या लोकांचे नमुने तपासणीकरीता पाठविल्यानंतर रिपोर्ट यायला उशीर लागत होता. त्यामुळे सदर लोक पॉझिटिव्ह आहे की, निगेटिव्ह हे कळत नव्हते. यादरम्यान पॉझिटिव्ह असलेले लोक कुठे कुठे फिरले असतील, किती लोकांच्या संपर्कात आले असतील, याचा अंदाजच लागत नव्हता. मात्र, आता कोरोनाची लक्षणं असलेले नमुने इतरत्र पाठविण्याची गरज नाही. तसेच त्याचे निदान यवतमाळ येथे होणार असल्याने उपचार मिळण्यासही मदत होणार आहे. त्याची रितसर परवानगी आता ICMR कडून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळाला मिळाली आहे . कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व अडचणींचा सामना करून अखेर ही प्रयोगशाळा यवतमाळमध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे लवकर निदान आणि त्वरीत उपचार होणं सोप होणार आहे.
संबंधित बातम्या :
Plasma Therapy | पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी
Plasma Therapy | प्लाझ्मा थेरपी सकारात्मक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा दावा