(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Wadettiwar : एका विशिष्ट समाजाला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न; मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar : मागासवर्ग आयोग गुंडाळून एका विशिष्ट समाजाला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं म्हणत वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
नागपूर : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे (Anand Nirgude) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे निरगुडे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची सर्वप्रथम 'एबीपी माझा'ने बातमी दाखवली होती. आता त्यांच्या राजीनाम्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. यावरच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. मागासवर्ग आयोग गुंडाळून एका विशिष्ट समाजाला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं म्हणत वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. नागपूर येथे ते बोलत होते.
दरम्यान, यावेळी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, "मी मंत्री असताना मागासवर्ग आयोगावर आनंद निरगुडे यांची नियुक्ती केली होती. देवेंद्र फडणवीस म्हणतात की त्यांचा डीएनए ओबीसीचा आहे. मात्र, मागासवर्ग आयोग बरखास्त करण्याचा हा जो खटाटोप चालला आहे, तो थांबवला पाहिजे. यापूर्वी चार जणांनी राजीनामा दिला होता, आता अध्यक्षांनी राजीनामा दिला. मागासवर्ग आयोग गुंडाळून एका विशिष्ट समाजाला संरक्षण देण्यासाठी आणि ओबीसींचं खच्चीकरण करण्यासाठी हे सर्वकाही प्रकार सुरु असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे."
दिशा सालियान प्रकरणावर प्रतिक्रिया...
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी पुन्हा एकदा राज्याचं राजकारण ढवळून निघाले असून, या प्रकरणी एसआयटी स्थापन केली जाणार आहे. यावर बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, "अशाप्रकारे बदल्याचं राजकारण करू नये. हे राज्यामध्ये फोफावत आहे. आज तुमच्या हातात सत्ता आहे, उद्या दुसऱ्याच्या हातात राहील. वेगळे विचार करून राजकारण केले पाहिजे. बदला घेण्यासाठी राजकारण करू नये. निवडणुकांसाठी आलेला सर्व्हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. त्यामुळे निवडणुका लावून घेतल्या जात नाही. बजरंग बलीचं नाव भाजप घेत असेल, तरीही जनतेची गदा यांची पाठ फोडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे घाबरून अशा पद्धतीने सत्तेचा वापर सरकार करत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे."
युवा संघर्ष यात्रेत जाणार...
दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा देखील नागपुरात दाखल झाली असून, या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात स्वतः शरद पवार उपस्थित राहणार आहेत. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, "शरद पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे. माझा ही वाढदिवस आहे. त्यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद मिळत असेल, तर मी नक्की युवा संघर्ष यात्रेत जाणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राज्य सरकारने आनंद निरगुडे यांचा राजीनामा स्विकारला