महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी अकोल्याचे विजय मालोकार
अकोल्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते विजय मालोकार (Vijay Malokar )यांची महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोला : अकोल्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते विजय मालोकार यांची महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष 2021 साठी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे उपनेते, माजी केंद्रीयमंत्री खासदार अरविंद सावंत यांची एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता त्यांच्यासोबत विजय मालोकार यांच्यावर कार्याध्यक्षपद देत एसटी कामगार सेनेचा राज्यभरात विस्तार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे विजय मालोकार यांचं पक्षातलं महत्त्व वाढणार आहे.
मुंबईतील पक्षाचं मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनातून एसटी कामगार सेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून जाहीर करण्यात आल्यात. यात विजय मालोकार यांच्यावर प्रदेश कार्याध्यक्षपदासारखी महत्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. विजय मालोकार हे शिवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख राहिले आहेत. यासोबतच पक्षाचे यवतमाळ, अकोला आणि वाशिमच्या सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. 1995 मध्ये राज्यात युतीची सत्ता असतांना विजय मालोकार यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या संचालकपदी करण्यात आली होती. एसटी महामंडळात कर्मचारी असतांना मालोकार यांनी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा विस्तार करण्यासाठी ठोस प्रयत्न केले होते. त्यांनी एसटी कामगार सेनेत विभागीय सचिव, प्रादेशिक सरचिटणीस, प्रदेश सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. नियुक्तीचे आदेश निघाल्यानंतर मालोकार यांना तातडीने मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. मालोकार यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जेष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई, एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, अकोला संपर्कप्रमुख प्रकाश शिरवाडकर आणि अकोला जिल्हा शिवसेना, शिवसैनिक, संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे.
कोण आहेत विजय मालोकार :
# अकोला येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख.
# शिवसेनेचे अकोला, यवतमाळ आणि वाशिमचे माजी सहसंपर्कप्रमुख.
# 1995 मध्ये युती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचे संचालक.
# 1999 मध्ये बोरगावमंजू (आताचा अकोला पूर्व) मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी.
# 2004 मध्ये बोरगावमंजू मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अत्यल्प मतांनी पराभव. 2009 मध्ये अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून 30 हजार मतं घेतलीत.
राज्यातील एसटी कामगार संघटनांमध्ये 'महाराष्ट्र एसटी कामगार सेने'चा दबदबा :
राज्यात एसटी कामगारांच्या अनेक संघटना आहेत. यामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ही एक महत्त्वाची संघटना आहे. मध्यंतरी या संघटनेतही वर्चस्वावरून दोन गट पडले होते. याशिवाय अनेक पक्षांच्या एसटी कामगार संघटनाही आस्तित्वात आहेत. यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे अशा अनेक पक्षीय संघटना आहेत. यात शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचं संपूर्ण राज्यभरात मोठं संघटन आहे. सध्या राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली 'महाविकास आघाडी'चं सरकार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. याशिवाय एसटीचा कारभार हाती असलेलं परिवहन मंत्रीपद आणि एसटी महामंडळाचं अध्यक्षपद शिवसेनेच्या अनिल परब यांच्याकडेच आहे. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या नियुक्त्यांना महत्त्व आहे.
राज्यात एसटी कामगार सेनेच्या नेतृत्वात एसटीला गतवैभव मिळवून देवू : विजय मालोकार
आपल्याला महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्त करीत पक्षप्रमुखांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी विनम्र भावना यावेळी विजय मालोकार यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना व्यक्त केली. आज शिवसेनाप्रमुखांची प्रकर्षानं आठवण येत असल्याचे सांगतांना मालोकार भावूक झाले होते. पुढच्या काळात पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेची बांधणी करण्याचा निर्धार यावेळी मालोकार यांनी व्यक्त केला. एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार सेना पुढच्या काळात अधिक जोमाने प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मालोकार यांनी सांगितले. यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनात लवकरच राज्यव्यापी संघटना बांधणी कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.