Unseasonal Rain : विदर्भात अवकाळी पावसाचा धूमाकूळ सुरूच; अनेक झाडे उन्मळून पडली, शेतमालाचेही प्रचंड नुकसान
Unseasonal Rain : नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम असल्याचे बघायला मिळत आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दाणादान उडवल्याचे चित्र असून यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Vidarbha Unseasonal Rain : गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. राज्यात एकीकडे पाणीटंचाईचे भीषण सावट असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दाणादान उडवल्याचे चित्र आहे. काल दुपारनंतर नागपूरसह विदर्भात पावसाचा जोर कायम असल्याचे बघायला मिळाले. अनेक ठिकाणी वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने सर्वत्र हाहाकार माजवल्याचे बघायला मिळाले.
यात अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांचा घरावरील पत्रे उडून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तसेच आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) यलो अलर्ट देण्यात आला आहे. संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
अवकाळी पावसाने नागपूरला झोडपलं
राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपलं आहे. काही ठिकाणी उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तर काही ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच काल दुपारनंतर वर्धा जिल्ह्याला अवकळी पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढलं. यात वर्धा जिल्ह्यातील आर्वीच्या टाकरखेड परिसराला अवकाळी पाऊस आणि वादळाचा जबर तडाखा बसला. या वादळी वाऱ्यामुळे पाच ते सहा घरांचे टिनपत्रांच छत उडाल्याने मोठे नुकसान झालंय. तसेच या पावसामुळं घरातील धान्यही भिजले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. तर बऱ्याच भागात वीजपुरवठा खंडित झाला झाल्याचे बघायला मिळाले.
अनेक झाडे उन्मळून पडली
अशातच काल दुपारनंतर नागपूर आणि लगतच्या परिसरात अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटास 30-40 प्रतितास सोसाट्याचा वाऱ्याने झोपडपून काढलं. यात अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली, तर जवळ जवळ निम्म्या शहरात वीजपुरवठा खंडित झाल्याचे बघायला मिळाले . दिवसभर उन्हाचा तडाखा कायम असताना अचानक दुपारच्या सुमारास पावसाळी ढगांनी दाटी केली आणि त्यानंतर सोसाट्याचा वाऱ्यासह अवकाळी पावसाने शहराला झोपडपून काढलं. यात अनेक ठिकाणी मोठी झाडे कारवर कोसळून मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या आणि त्यामुळे वाहतूक देखील काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर अग्निशमन पथकाला पाचारण करून ही झाडे हटविण्यात आली.
आज 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.पुढील काही तासात या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, 30-40 प्रतितास सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. तर त्या नंतर आकाश पूर्णता मोकळे असणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
लिंबूचे दीडशे झाडं उन्मळून पडली
वाशिमच्या मालेगाव तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली. यात वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथील शेतकरी अनिल बुद्धिवंत यांच्या शेतातील लिंबूचे दीडशे झाडं उन्मळून पडली असून त्यात त्यांची संपूर्ण बाग उध्वस्त झालीये. यावर्षी त्यांची बाग चागलीच बहरली होती. तसेच लिंबु पिकाला चांगले दर देखील मिळत होते. कडक उन्हामुळे लिंबूची मागणी वाढल्याने याच बागेतून दीड लाखाचे उत्पन्न मिळाले होते. तर येत्या महिन्याभरात हजारो रुपये उत्पन्न होण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र त्याआधीच नैसर्गिक संकटाने अचानक बाग उध्वस झाल्याने अनिल बुद्धिवंत हवालदिल झालेत. या नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये.
इतर महत्वाच्या बातम्या
निवृत्त भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा गाझा हल्ल्यात मृत्यू, वैभव काळे नागपूरचे रहिवासी