'त्या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7.5 लाखांची मदत; विशेष बाब म्हणून अजित पवारांनी घेतली निर्णय
नाशिकमध्ये घडलेल्या या हिट अँड रन प्रकरणाची दखल घेत तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मुंबई : अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक (Nashik) येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान तथा वाहन चालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकरणांमध्ये सत्वर मदत होण्याच्या दृष्टीने गृह विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण तात्काळ करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी म्हटले. नाशिकमध्ये मद्यसाठा घेऊन धावणाऱ्या अज्ञात वाहनाचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सरकारी वाहन उलटल्याचा प्रकार चांदवड-मनमाड रोडवरील हरनुल टोलनाक्याजवळ 7 जुलै 2024 रोजी घडला होता. या अपघातात राज्य उत्पादन शुल्क विभागातील एक कर्मचारी जागीच ठार झाला तर दोन पोलीस जखमी झाले होते.
नाशिकमध्ये घडलेल्या या हिट अँड रन प्रकरणाची दखल घेत तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, आता या राज्यात महायुतीचे पुन्हा सरकार आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पदभार हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे, नाशिकमधील घटनेची दखल घेत या हीट अँड रन प्रकरणातील मृत्यू पावलेल्या पोलीस कुटुंबीयांच्या वारसास 7 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्र.1 मधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर 7 जुलै 2024 रोजी रात्री कारवाई केली होती. अवैध मद्यविक्री करणाऱ्या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करीत असताना राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या भरारी पथकाच्या वाहनाला आरोपींच्या वाहनाने धडक दिली व त्यामध्ये जवान तथा वाहनचालक कैलास गेणू कसबे यांचा मृत्यू झाला होता. अजित पवार यांनी या खात्याचा कार्यभार घेताच या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सन 2014 मध्ये गृह विभागाने केलेल्या मदतीच्या धर्तीवर (पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय ठरल्याप्रमाणे साडेसात लाख रुपये) राज्य उत्पादन शुल्क विभागातील दिवंगत जवान कैलास कसबे यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून 7.50 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
शंभुराज देसाईंनीही दिले होते आश्वासन
दरम्यान, तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनीही, आम्ही संबंधित मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला विभागाकडून मदत देऊ, अशी घोषणा केली होती. तसेच, आमची जी मोहीम सुरू आहे ती अशीच सुरु राहील. कर्तव्य बजावत असताना कर्मचार्याचा जीव घेणं योग्य नाही. यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले होते.























