गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा हुल्लडबाजी; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
Maharashtra Solapur News: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा हुल्लडबाजी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी चाहत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
Maharashtra News: गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम हा सध्या पोलीस (Maharashtra Police) खात्याला डोकेदुखी बनत चालला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचाच प्रत्यय पुन्हा वेळापूर (Velapur) येथे आला. वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर यात्रा समितीच्या वतीनं वेळापूर येथील विराट पालखी मैदानावर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गौतमी वेळेवर कार्यक्रम स्थळी पोहोचली देखील. मात्र माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील गौतमीचे चाहते हजारोंच्या संख्येनं या पालखी मैदानावर जमा झाले होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच गाण्याला प्रेक्षकांतून हुल्लडबाजी सुरू झाली.
पोलिसांनी प्रेक्षकांना शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र हुल्लडबाजी सुरूच राहिल्यावर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली. गाणं मध्येच थांबवून पोलिसांनी प्रेक्षकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं. पण तरीदेखील हुल्लडबाजी सुरूच राहिल्यानं पोलिसांना अॅक्शन मोडवर यावं लागलं. त्यानंतर गौतमीच्या एन्ट्रीलाही प्रेक्षकांनी मोबाईलचे दिवे लावून तिचं स्वागत केलं. मात्र तिची अदाकारी सुरू होताच गोंधळ सुरूच राहिला. गोंधळ करणाऱ्यांना ओळखण्यासाठी ड्रोन कॅमेरातून शूटिंग केलं जात असल्याचं सांगितल्यावर गोंधळ कमी झाला. गौतमीच्या चाहत्यांना तिची ठराविक गाणी ही पर्वणीच असते आणि यातूनच गौतमीचा स्टेजवर आणि चाहत्यांचा खाली प्रेक्षकात उभं राहून सामुहिक डान्स सुरू राहिला. या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीनं राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच गोंधळ न करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र अतिउत्साही रसिकांचा फटका या कार्यक्रमालाही बसला.
गौतमीच्या कार्यक्रमांना महाराष्ट्राबाहेरदेखील मागणी
महाराष्ट्रात गावोगावी हजारोंच्या रेकॉर्डब्रेक उपस्थितीत कार्यक्रम करणाऱ्या गौतमी पाटील हिला आता इतर राज्यातूनही कार्यक्रमासाठी मागणी येऊ लागली आहे. सध्या तरी महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला नसल्याचा गौप्यस्फोट गौतमी पाटील हिनं एबीपी माझाशी बोलताना केली. वेळापूर येथे गौतमीनं कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं एबीपी माझाशी खास बातचित केली. गौतमीच्या नखरेल अदाकारीवर अवघा महाराष्ट्र फिदा आहे. पण सोशल मीडियावर तिच्या रिल्स आणि व्हिडीओला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. यातूनच आता गौतमीचे कार्यक्रम आपल्याही राज्यात व्हावेत, यासाठी आयोजक धडपडू लागले आहेत. याबाबत तिला थेट विचारताच तिनं अशी मागणी येत असली तरी अजून महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम करण्याबाबत विचार केला नसल्याचं तिनं सांगितलं आहे.