Pune Bypoll Election : भाजप, महाविकास आघाडी की थेट हिंदू महासंघ; कसब्यात प्रकाश आंबेडकर कोणाला देणार साथ ?
कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका उद्या (21 फेब्रुवारी) स्पष्ट होण्याची शक्यता आहे. उद्या पुण्यातील बाणेर येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची महत्वाची बैठक आहे.
Pune Bypoll Election : कसबा (Kasba Bypoll Election) पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका उद्या (21 फेब्रुवारी) स्पष्ट होण्याची शक्यता आहे. उद्या पुण्यातील बाणेर येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची (Vanchit bahujan aghadi) महत्वाची बैठक आहे. या बैठकीत काही महत्वाच्या आणि गंभीर विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वंचितनं एकीकडे चिंचवड पोटनिवडणुसाठी भूमिका जाहीर केली आहे. मात्र, कसब्यासंदर्भात कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. उद्याच्या बैठकीत कसब्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. यासोबतच राजकीयदृष्ट्या काही महत्वाच्या बाबीवर कार्यकारिणीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला प्रकाश आंबेडकरांसह प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर आणि कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. महत्वाच्या असलेल्या कसबा पोटनिवडणुकीसंदर्भातील पाठिंब्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या आंबेडकरांनी ठाकरेंसोबत मैत्री केली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांना महत्व देत नसल्याने वंचितमध्ये अस्वस्थता आहे, त्याबाबतदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे. वंचितच्या प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. याच कार्यकारीणीतील काहींची हकालपट्टी किंवा पदाधिकारी सोडून जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच अनेक लोक वंचित आघाडीत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचाराचा धुराळा सुरु आहे. त्यात वंचित आघाडी कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर त्यांनी चिंचवडचे अपक्ष आमदार राहुल कलाटे यांना पाठिंबा दर्शवला. काहीच दिवसांपूर्वी आंबेडकर आणि ठाकरे एकत्र आले. मात्र तरीही त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. त्यात अपक्ष आमदार राहुल कलाटे यांना वंचितने पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.
इकडे कसबा मतदारसंघाची निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघात नेत्याकडून चांगलाच कस लावला जात आहे. भाजपकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे. मात्र भाजपने टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण समाजाची नाराजी समोर ठेवून हिंदू महासंघाने उमेदवार आनंद दवेदेखील रिंगणात आहे. तिघांकडूनही जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र वंचित आघाडी नेमकं कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.