युतीचं काही झालं, तरी लढणार की नाही? उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना प्रश्न
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार, आमदार, पदाधिकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी सर्वांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. "युती होईल किंवा नाही होईल याची चिंता करू नका. तुम्ही तुमच्या कामाला लागा", असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला.
मुंबई : आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेनं जोरदार तयारी सुरु केली आहे. युती होणार की नाही याबाबत सर्वांमध्येच संभ्रम आहे. मात्र युतीबाबत विचार करु नका आणि निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिल्या आहेत.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काही खासदार, आमदार, पदाधिकऱ्यांची बैठक पार पडली. अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर यांच्यासह अन्य नेते आणि प्रवक्ते या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी सर्वांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. "युती होईल किंवा नाही होईल याची चिंता करू नका. तुम्ही तुमच्या कामाला लागा", असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला.
"जिथे जिथे शिवसेना कमजोर असेल तिकडे पक्ष मजबूत करा", अशा सूचना उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.
युतीबाबत शिवसैनिकांना काय वाटतं याची चाचपणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट उपस्थितांना विचारणा केली. युती झाली नाही तर तुम्ही लढणार ना? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना विचारला. त्यावेळी सगळे 'हो' म्हणाले.
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी विचारलं की, 'आणि युती झाली तर लढणार का?' त्यावेळी तर सगळे जोरात 'हो' म्हणाले. त्यामुळे युती होईल की नाही याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. मात्र शिवसैनिकांना युतीबाबत काय वाटतं याची तपासणी उद्धव ठाकरेंनी सुरु केली आहे.
दरम्यान, प्रशांत किशोर हे घटकपक्षातील महत्त्वाचे सदस्य आहेत, जदयूचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची ही केवळ सदिच्छा भेट होती. राजकीय भेट नव्हती. युतीची चर्चा सुरू नाही. युतीसाठी कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही. आगामी लोकसभा निवडणुकांची रणनिती आणि समीकरणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवत आहेत. तसेच आगाम पंतप्रधान शिवसेना ठरवेल, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.