Tukaram Mundhe : विकासाच्या 'गाथा' सांगणाऱ्या राजकीय सत्तेला प्रशासनातील 'तुकाराम' मात्र झेपेना! 19 वर्षांत कोणत्या 21 खात्यांमध्ये मुंढेंची बदली झाली?
आयएएस अथवा आयपीएस अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी किमान दोन ते अडीच वर्षे सेवा करण्याची संधी दिली जाते. तथापि, तुकाराम मुंढे हे एकमेव अधिकारी असे अधिकरी आहेत जे अपवाद ठरले आहेत.
Tukaram Mundhe : सत्तेपुढं शहाणपण चालत नाही, अशी एक मायबोली मराठीमध्ये प्रचलित म्हण आहे. ही म्हण किती उपरोधिक आहे याचा दाखला सातत्याने राज्यातील धडाडीचे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) घेत आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला त्यांना आणि ज्यांना भ्रष्टाचाराचा कथित नायनाट करायचा आहे त्यांना सुद्धा गेल्या 19 वर्षाच्या प्रशासकीय सेवेत तुकाराम मुंढे कोणालाच झेपले नाहीत ही शोकांतिका झाली आहे. आता पुन्हा एकदा बदली झाल्याने तुकाराम मुंढे चर्चेत आले आहेत. कार्यशैलीवर आक्षेप असू शकतात, पण बदली हा उतारा होऊ शकत नाही, इतकंही राजकीय औदार्य आजपर्यंत कोणत्याच सत्तेला दाखवता आलेलं नाही, ही त्यापेक्षा भयंकर शोकांतिका झाली आहे. आयएएस अथवा आयपीएस अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी किमान दोन ते अडीच वर्षे सेवा करण्याची संधी दिली जाते. तथापि, तुकाराम मुंढे हे एकमेव अधिकारी असे अधिकरी आहेत जे अपवाद ठरले आहेत. अवघ्या काही दिवसांमध्येही त्यांची बदली करण्याचा पराक्रम झाला आहे.
बदलीचा खेळ थांबेना, पण मुंढे बदलले नाहीत!
योद्धा शरण येत नाही, तेव्हा बदनाम केले जाते, असंही सातत्याने म्हटले जाते. मात्र, त्याच भाषेत मुंढे बदलत नसल्याने बदली करून जेरीस आणण्याचा कुटील डाव करूनही ते बदलले नाहीत, अशीच प्रतिमा तुकाराम मुंढे यांची झाली आहे. प्रशासकीय सेवेचं स्वप्न उराशी बाळगून 2005 पासून ते 2024 पर्यंत मुंढें यांनी सर्वाधिक बदल्याच पाहिल्या आहेत. आतापर्यंत झालेली त्यांची 22 वी बदली ठरली आहे. त्यामुळे एखाद्या विभागात गेल्यानंतर त्यांना स्थिरस्थावर होऊ देण्यापूर्वीच बदलीचा आदेश निघत गेला आहे. गेल्या 19 वर्षांमध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये त्यांचे बदलीचे आदेश निघत गेले आहेत. आता ताजी बदली त्यांची विकास आयुक्त (असंघटित कामगार) खात्याच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंढेंची शिस्त आणि बदलीचा ससेमीरा
प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणा लोकशाही प्रक्रियेत कधीच बाजूला करता येत नाहीत. घटनेनं त्यांचं महत्व अधोरेखित केलं आहे. प्रशासकीय यंत्रणेतील मुजोरपणा हा नवीन नसला, तरी सगळेच एका माळेचे मणी आहेत, असं म्हणणं उचित होणार नाही. तुकाराम मुंढे यांनी गेल्या कोणत्याही खात्यामध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर त्या विभागाला शिस्त लावण्याचे काम पहिल्यांदा केलं आहे. अगदी कार्यालयातील लेट लतीफापासून ते खाबूगिरीपर्यंत सर्वांवर वचक ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांना स्थिरस्थावर होऊ देण्यापूर्वीच त्यांच्या पुढील बदलीचा आदेश आलेला असतो. असे दिसून आलं आहे. मुंढे यांनी ऑगस्ट 2005 मध्ये सोलापुरात प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय यंत्रणेत पाऊल ठेवले. सप्टेंबर 2007 मध्ये उपजिल्हाधिकारी, देगलूर उपविभागात त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून त्यांची शिस्त आणि बदली हा लपंडाव होत गेला आहे.
दुग्ध खात्यात गेले सत्कार झाला!
तुकाराम मुंढे यांची जुलै 2022 मध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागात नियुक्ती करण्यात आल्यानंतर दूध उत्पादक संघाच्या मालकांनी मंत्रालयात येऊन त्यांचा सत्कार केला होता. दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिल्याने आभार मानण्यात आले होते.
आरोग्य खात्यात जाताच अनेकांची 'तब्येत' बिघडली
राज्याची आरोग्य व्यवस्थेची कोरोना कालखंडात लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. यानंतर राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत किती आमुलाग्र बदलाची गरज आहे याची सुद्धा चर्चा झाली होती. कोरोना संकट मागे सरल्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये मुंढे यांची आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुक्तपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे आरोग्य खात्याला शिस्त लागेल, अशी धारणा होती. तथापि, त्यांची कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आली. यावेळी सुद्धा त्यांची शिस्त आरोग्य खात्यात अनेकांची 'तब्येत' बिघडवण्यास कारणीभूत ठरली होती. त्यांनी सरकारी रुग्णालयातून सक्तीच्या केलेल्या चाचण्या सुद्धा अनेकांच्या 'त्रासदायक' ठरल्याचे बोलले जात होते.
तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत कोणत्या ठिकाणी बदली झाली?
- ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
- सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
- जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
- मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग
- जुलै 2009 - सीईओ, वाशिम
- जून 2010 - सीईओ, कल्याण
- जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना
- सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई
- नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी
- मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका
- मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
- फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका
- नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन
- डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
- जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका
- ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
- जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
- सप्टेंबर - 2022 - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
- 2022 - मराठी भाषा विभाग
- जुलै 2022 - पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
- जून 2024 - विकास आयुक्त (असंघटित कामगार)
इतर महत्वाच्या बातम्या