Beed : सुरक्षा न बाळगता उपचार, नित्रुडमध्ये बोगस वैद्याचा आयुर्वेदिक दवाखाना सील
बीडमधील जनसेवाआयुर्वेदिक उपचार केंद्रात सुरक्षेशिवाय उपचार केले जात असल्याच्या तक्रारी वैद्यकीय विभागाला मिळाल्या होत्या. त्यानंतर हा दवाखाना सील करण्यात आला आहे.
बीड : हाडांच्या आजारावर उपचार करण्याच्या नावाने दवाखाना थाटणाऱ्या बीडमधील बोगस वैद्य पिता-पुत्रावर कारवाई करण्यात आली आहे. माजलगावजवळच्या नित्रुडमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्र हे बोगस असल्याचं समोर आल्यानंतर हा आयुर्वेदिक दवाखाना आता सील करण्यात आला आहे. तर दोघेही पसार झाले आहेत.
तेलगाव माजलगाव या रस्त्यावर असलेल्या नित्रुडमधील सुभाष राठोड हा बोगस वैद्य मागील अनेक दिवसांपासून अनाधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करत होता. विशेष म्हणजे या आयुर्वेदिक दवाखान्याला त्याने जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्र असे नाव सुद्धा दिले आहे.
रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या किंवा कोणतीही शास्त्रोक्त पद्धतीशिवाय हा बोगस वैद्य रुग्णांवर उपचार करत होता. या आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या संदर्भात वैद्यकीय विभागाला तक्रारी मिळाल्या होत्या. यावरुन बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशान्वये माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांनी रुग्णालयावर छापा टाकला. यावेळी सुभाष राठोड नामक वैद्य अवैधरित्या रुग्णांना तपासत असल्याचं निदर्शनास आलं.
कोणताही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना सुभाष राठोड जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली बोगस वैद्यकीय व्यवसाय करत होता. छापा टाकणाऱ्या वैद्यकीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी सुभाष राठोड यांच्याकडे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करत असल्याबाबतची माहिती मागितली असता, अधिकृत कुठलेही कागदपत्रे त्याच्याकडे आढळली नाहीत.
विशेष म्हणजे तपासणीसाठी गेलेल्या पथकाला रंगेहाथ उपचार करताना सापडलेल्या सुभाष राठोडकडे आयुर्वेदिक औषधी, गोळ्या तसेच अनधिकृत वैद्यकीय कागदपत्र सुद्धा आढळून आले आहेत. या सोबतच याठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती असलेले एक रजिस्टर यावेळी या पथकाच्या हाती लागले आहेत.
डॉ. अमोल मायकर यांच्या फिर्यादीवरुन सुभाष बाबुराव राठोड यांच्यावर कलम 420 सह वैद्यकीय व्यवसायिक अधिनियम 1961 अन्वये कलम 33 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका स्तरीय पथकाने संबंधित उपचार केंद्र सील केले आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन
अतिशय निष्काळजीपणे रुग्णांवर हाडांची आजार दुरुस्त करण्यासाठी कुठलीही सुरक्षा न बाळगता उपाययोजना करताना सुभाष राठोड आढळून आला. त्याची उपचारपद्धती पाहता ही रुग्णांच्या जीवावर बेतणारे आहे म्हणूनच रुग्णाच्या जीविताला धोका होण्याची संभावना नाकारता येत नाही. कुठल्याही रुग्णांनी शासनमान्य रुग्णालयायाशिवाय अशा बोगस वैद्यांकडे उपचार घेऊ नये, असं आवाहन माजलगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांनी केले आहे.