(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 08 ऑक्टोबर 2022 : शनिवार
Smart Bulletin : दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. यवतमाळहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसला नाशिकमध्ये अपघातानंतर भीषण आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू, 38 जखमी, मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करणार
महाराष्ट्रातील नाशिक येथे मोठी दुर्घटना घडली आहे. खासगी बसला (Bus Fire) भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जवळ नांदूर नाका येथे बसला आग लागून हा मोठा अपघात झाला आहे.
2. नाशिक बस अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश, मृतांच्या वारसांना पाच लाखांच्या मदतीचीही घोषणा तर पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून दुःख व्यक्त
नाशिकमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. खासगी बसला भीषण आग लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. या घटनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांसह आयुक्तांशी माझे बोलणे झाले आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत. उपचरात काही कमी पडू नयेत अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले
3. अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिक प्रवासी? पालकमंत्री संजय राठोड यांचे चौकशीचे आदेश
अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले असल्याचे निदर्शनास येत असून त्याची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. त्यांनी अपघात झाल्यानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेट दिली. नाशिक जिल्हाधिकारी यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधला. शिवाय ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांबाबत माहिती घेतली. आग लागण्यामागे कारण काय, ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती काय याबाबत माहिती घेऊन मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या.
4. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा, मुंबईलाही यलो अलर्ट, गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान
राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने मुंबईसह राज्याला झोडपले आहे. हाच परतीचा पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर आज 8 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.
5. केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे गटाच्या आकड्यांना ठाकरे गटाचं उत्तर, शिंदे गटाच्या आमदारांची संख्या शून्य असल्याचं नमूद तर दुपारी 2 वाजेपर्यंत दावे सादर करणार, अन्यथा निर्णय घेणार, आयोगाचा इशारा
6. आरक्षणानंतर सामाजिक विषमता आणि अस्पृश्येतवर सरसंघचालक मोहन भागवतांचा प्रहार, आपल्या पूर्वजांनी केलेल्या अत्याचारांचं पापक्षालन करायला हवं, भागवतांचं वक्तव्य
7. मुलायम सिंह यांची ऑक्सिजन लेवल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात, पण प्रकृती चिंताजनकच
गेल्या सात दिवसापांसून समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकती नाजूक असल्याची माहिती हॉस्पीटलच्या प्रशासनानं दिली आहे. सात दिवसांनंतर मुलायम सिंह यादव याच्याबाबत हॉस्पिटलमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुलायम सिंह यांची ऑक्सीजन लेवल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनानं दिली आहे. पण मुलायम सिंह यांची प्रकृती चिंताजनकच असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनानं दिली आहे.
8. गुजरात एटीएसकडून 350 कोटींचं हेरॉईन जप्त, पाकिस्तानी बोटीवर कारवाई, तपास सुरू
गुजरात एटीएसने मोठी कारवाई करण्यात यश मिळवलं आहे. गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी बोट पकडून 350 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केलं आहे. गुजरात एटीएसने 8 ऑक्टोबर रोजी भारतीय तटरक्षक दलासह संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.
9. भारतीय वायुदलाचा आज 90वा स्थापना दिवस, चंदिगडमध्ये दिसणार एअर फोर्सची चित्तथरारक प्रात्यक्षिकं
10. दुखापत भारतीय संघाची पाठ सोडेना, टी-20 विश्वचषकापूर्वी आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळं टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान भारताचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहरला पायाला दुखापत झाली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला त्याला मुकावं लागलं होतं. एवढंच नाहीतर त्याची उर्वरित दोन्ही एकदिवसीय सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती पीटीआयनं बीसीसीआयच्या सुत्राच्या हवाल्यानं दिलीय. दीपक चाहरच्या दुखापतीनं भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं आहे. भारताच्या टी-20 विश्वचषकाच्या संघात दीपक चाहरचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आलाय.