Talathi Bharti: तलाठी भरतीचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसिंगेचा म्हाडा आणि पिंपरी पोलिस भरती घोटाळ्यातही सहभाग, दोन वर्षापासून होता फरार
Talathi Bharti Exam 2023 : म्हाडा पेपरफुटीप्रकरणी आणि पिंपरी चिंडवड पोलिस भरती घोटाळ्याप्रकरणी गणेश गुसिंगे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नाशिक: राज्यातील बहुचर्चित असलेल्या तलाठी पेपर फुटीमधील (Talathi Bharti Paper Leak) आरोपी गणेश गुसिंगे याच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गणेश गुसिंगेचा म्हाडा पेपर फुटीमध्ये आणि 2019 सालच्या पिंपरी चिंचवड पोलिस घोटाळ्यामध्येही समावेश असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी त्याच्यावर 2021 साली गुन्हा नोंद करण्यात आला होता. पण पोलिसांनी फरार असलेल्या या आरोपीला दोन वर्षे कसे काय अटक केली नाही असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. तलाठी भरतीच्या पेपर फुटीमध्ये मोठं रॅकेट असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
यात धक्कादायक बाब म्हणजे तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी नाशकात अटक करण्यात आलेला आरोपी गणेश गुसिंगे हा म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात फरार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात म्हाडा परीक्षा भरतीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2019 मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर याच गुसिंगेवर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांसाठी हा फरार आरोपी असताना एवढे दिवस या आरोपीला अटक करण्यास कसे लागले? असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि हायटेक कॉपी करण्यामध्ये एक टोळीच कार्यरत असल्याचा संशय समितीला असून यामध्ये गणेश घुसिंगे आणि त्याचे साथीदार यामध्ये सामील असल्याचा आरोप संघटनेकडून केला जातो आहे.
बहुचर्चित तलाठी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिकसह नागपूरमध्ये गैरप्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये तर एक हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला असून आरोपीकडे चक्क वॉकी टॉकी आणि प्रश्नपत्रिकेचे फोटोच पोलिसांना आढळून आले आहे. विशेष म्हणजे संबंधित आरोपी यापूर्वीदेखील परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या एका गुन्ह्यात फरार असल्याचं पोलीस तपासात दिसून आलं. त्यामुळे राज्यात अशाप्रकारे काम करणारे एखादे रॅकेटच कार्यरत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
बहुप्रतीक्षित आणि आरक्षण आणि पेसा कायद्यातील तरतुदींमुळे अडकून पडलेल्या तलाठी भरती परीक्षेला मुहूर्त लागला आणि 17 ऑगस्टपासून या परीक्षेला सुरुवात झाली. राज्यभरात ही परीक्षा ऑनलाईन होणार असून 4 हजार 466 जागांसाठी तब्बल 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी यासाठी अर्ज केला. परीक्षार्थींची ही संख्या लक्षात घेता 14 सप्टेंबर पर्यंत ही परीक्षा पार पडणार आहे. लाखो परीक्षार्थीमध्ये आपला क्रमांक कधी लागेल? आपण उत्तीर्ण होणार का? याच विचारात सर्वजण असतानाच नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याचं उघडकीस आलं आणि त्यामुळे राज्यभरातच खळबळ उडाली आहे.
तीन सत्रात ही परीक्षा पार पडत असतानाच पहिल्या सत्रात नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेब ईझी या परीक्षाकेंद्रावर परीक्षा सुरू होती. दरम्यान यावेळी काही जण कॉपी सारखा प्रकार करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच केंद्राबाहेर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली आणि केंद्रावर हायटेक कॉपी सुरु असल्याचं समोर आलं.
ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव गणेश गुसिंगे असून तो मूळचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्याकडून एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन आणि हेडफोन असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचे फोटोही मिळून येताच म्हसरूळ पोलीस ठाण्यात गणेश गुसिंगेसह, सचिन नायमाने आणि संगीता गुसिंगे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गणेशला अटक करण्यात आली आहे तर इतर दोघे फरार आहेत. संगीता ही गणेशची बहीण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ती परीक्षा केंद्रात पेपर देत होती तर त्यांचा तिसरा साथीदार सचिन हा या दोघांना मदत करत होता अशी चर्चा आहे.
म्हसरूळ पोलीस ठाण्यात हद्दीत एका केंद्रावर परीक्षा सुरू होती. एक तरुण संशयास्पदरित्या बाहेर बसला आहे अशी माहिती काहींनी पोलिासांना दिली. अंग झडतीत एक टॅब, दोन मोबाईल, एक वॉकी टॉकी आणि श्रवणयंत्र मिळून आले. मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटोही होते. कोणाला तरी तो उत्तर देत होता असे लक्षात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
गणेश गुसिंगे हा औरंगाबादचा असून पोलिस पुढील तपास करत आहोत. आरोपीची पार्श्वभूमी तपासली जात असून तो कोणाच्या संपर्कात होता याचाही तपास केला जात आहे.
एकंदरीतच काय तर हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नक्कीच नाही. आरोपी गणेश गुसिंगे हा जवळपास दोन वर्षांपासून फरार असताना पोलिसांकडून त्याला एवढ्या दिवसात बेड्या का ठोकण्यात आल्या नाहीत? नाशिकला परीक्षा केंद्रात तो कोणाकोणाला मदत करत होता? त्याचे अजून कोणी साथीदार आहेत का? अशाप्रकारे काम करणारे एखादे रॅकेटच कार्यरत आहे का? राज्यात तलाठी परीक्षेत असे किती गैरप्रकार सुरू आहेत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
नाशिक पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाच्या खोलवर जाणार जाऊन तपास करणार का? तपासात नक्की काय माहिती समोर येणार? याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं असून भरती प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या गैरप्रकाराच्या मुद्द्याकडे सरकारने आता गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे.
ही बातमी वाचा: