Talathi Bharti Exam 2023 : पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिकमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार
Talathi Bharti Paper Leak : नाशिकमधील म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरुन एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून नागपूरमध्येही यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई: राज्यातील विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार काही केल्या थांबत नसल्याचं चित्र आहे. आता नाशिकमध्ये गुरूवारी घेण्यात आलेल्या तलाठी ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी - म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन करण्यात जप्त करण्यात आले आहेत.
आज राज्यातल्या विविध ठिकाणी तलाठी भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. नाशिकमधील म्हसरूळ या ठिकाणी या परीक्षेमध्ये गैरप्रकार घडल्याचं स्पष्ट झालं आहे. एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी एका तरूणाला अटक केली असून यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशयिताचे कोणी साथीदार आहेत का याचाही तपास सुरू आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वेबईझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती. याचवेळी परीक्षा केंद्राच्या बाहेर एक व्यक्ती संशयास्पद रित्या फिरत असल्याच दिसताच त्याची पोलिसांकडून अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडून एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, हेडफोन आणि असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये आजच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचे फोटोही मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात येऊन म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. सदरचा संशयित हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून परीक्षा केंद्रात तो कोणाला मदत करत होता? त्याचे अजून कोणी साथीदार आहेत का? अशाप्रकारे काम करणारे एखादे रॅकेट कार्यरत आहे का? याचा पोलिसांकडून शोध सध्या सुरू आहे.
दरम्यान, नाशिकसोबत नागपूरमध्येही तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या आधीच जर राज्याच्या गृहमंत्र्यानी दिशाभूल न करता पेपरफुटीवर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती असंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी शाससाने लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या. नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुलंमुली मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात, परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफुटी होते आणि या सर्व युवा वर्गाच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं जातं. वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर अधिवेशनात आवाज उठवला असता गृहमंत्री महोदयांनी पेपर फुटल्याचा बातम्या खोट्या असल्याचं सांगत राज्याची दिशाभूल केली होती. गृहमंत्री महोदयांनी तेंव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर आता पेपर फुटले नसते. युवांच्या प्रश्नांवर शासन दुर्लक्ष करणार असेल तर नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हा युवा वर्ग सीरियस झाला तर सरकारला खूप महाग पडेल. त्यामुळं पेपरफुटी होणार नाही याकडं शासनाने लक्ष द्यावं, ही कळकळीची विनंती!
तलाठी भरती परीक्षा केंद्रवाटपात गोंधळ
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरतीसाठीची परीक्षा तीन टप्प्यात होणार आहे. यासाठी परीक्षार्थीनी निवडलेल्या तीन केंद्रांऐवजी इतरत्र परीक्षा केंद्र दिल्याने तलाठी परीक्षा केंद्र वाटपात गोंधळ झाल्याचं दिसतंय. परीक्षार्थींना परीक्षेसाठी अर्ज करताना महसूल मंडळातील आपल्या जवळच परीक्षा केंद्र मिळेल असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीचे परीक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार झाल्यांच स्पष्ट झालंय.
ही बातमी वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI